आंबा-काजू उत्पादकांना मिळणार पॅकेजचा डोस
By admin | Published: April 10, 2015 04:11 AM2015-04-10T04:11:34+5:302015-04-10T04:11:34+5:30
अवकाळी पाऊस आणि गारपिटीत भरडल्या गेलेल्या आंबा व काजू उत्पादकांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच
मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीत भरडल्या गेलेल्या आंबा व काजू उत्पादकांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच शुक्रवारपर्यंत पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली.
अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचे झालेले नुकसान आणि फळ प्रक्रियेबाबत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर मंत्री खडसे यांनी उत्तर दिले.
नवीन किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकण्याआधीच आंबा गळू लागला आहे. यावर नव्याने संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आंबा गुणवत्ता तपासणी केंद्र दापोलीऐवजी रत्नागिरीत करण्याबाबत विचार सुरू असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. आंबा-काजू बोर्डाचे पुनरुज्जीवन करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, काढणीपश्चात प्रशिक्षण केंद्राची व्याप्ती राज्यभर वाढवण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
फळ प्रक्रियेबाबत सदस्यांनी नवीन प्रकल्प आणावेत, नियमात बसत नसले तरी अशा प्रकल्पांना प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्याचे आश्वासन खडसे यांनी या वेळी दिले. आंबा आणि काजू उत्पादकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी
रविवारी कोकण दौरा करणास असल्याचे सांगतानाच केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्पादकांचा मेळावा घेण्यात येईल, असे खडसे या वेळी म्हणाले. (प्रतिनिधी)