आंबा निर्यातीसाठी आखाती देशांना प्राधान्य अमेरिकेतील निर्यातही वाढणार : युरोप बंदीचा व्यापारावर परिणाम नाही
By admin | Published: May 9, 2014 09:13 PM2014-05-09T21:13:28+5:302014-05-09T22:39:07+5:30
युरोपीयन देशांनी आंब्यावर निर्बंध लादल्यामुळे निर्माण झालेले मळभ दूर होऊ लागले आहे. या वर्षी आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.
नामदेव मोरे,
नवी मुंबई : युरोपीयन देशांनी आंब्यावर निर्बंध लादल्यामुळे निर्माण झालेले मळभ दूर होऊ लागले आहे. या वर्षी आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. अमेरिकेमध्येही गतवर्षीपेक्षा जवळपास दुप्पट निर्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भारतामधून निर्यात होणार्या प्रमुख कृषी मालांमध्ये आंब्याचा समावेश आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने निर्यात वाढत आहे. २०१० - ११ मध्ये ५८,८६३ मेट्रिक टन आंबा निर्यात होऊन तब्बल १६४ कोटी ८३ लाख रुपयांची उलाढाल झाली होती. २०१२- १३ मध्ये निर्यात ५५,५८४ मेट्रिक टनावर गेली असून २६४ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. यावर्षी युरोपीय देशांनी आंब्यावर निर्बंध लादल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. निर्यातीवर परिणाम होऊन शेतकर्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु एकूण निर्यातीमध्ये युरोपीय देशांचा वाटा दहा टक्के आहे. गतवर्षी युनाटेड किंगडममध्ये ३३०४ मेट्रिक टन निर्यात होऊन ३२ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल झाली होती. इतर युरोपीय देशांमधील निर्यातीचा वाटा अत्यंत नगण्य होता.
युरोपीय देशांमधील बंदीमुळे व्यापार्यांनी आखाती देशांवर लक्ष केंद्रित केले आहे. आखातामध्ये माल निर्यात करताना अटीही कमी आहेत व माल पाठविणेही सोपे आहे. गतवर्षीपासून अमेरिकेमध्ये निर्यात वाढविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. गतवर्षी २४२ मेट्रिक टनाची निर्यात झाली होती. यावर्षी हे प्रमाण ४०० मेट्रिक टन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. युरोप बंदीचा बागुलबुवा न करता इतर पर्याय वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. न्यूझिलंडमध्येही मोठ्याप्रमाणात आंबा जात असून गतवर्षीपेक्षा जास्तच निर्यात होईल, असा विश्वास व्यापार्यांसह अपेडाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेवर लक्ष केंद्रित
अमेरिकेमध्ये आंबा निर्यात करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये फक्त ९९ मेट्रिक टन आंब्याची निर्यात होऊन १ कोटी ६२ लाख रुपयांची उलाढाल झाली होती. हे प्रमाण वाढविण्यासाठी नाशिकमध्ये विशेष निर्जंतुकीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे गतवर्षी निर्यात तब्बल २४२ मेट्रिक टनावर गेली असून, यावर्षी ४०० मेट्रिक टन आंबा अमेरिकेमध्ये जाईल अशी शक्यता वर्तविली जात असून, ८ मेपर्यंत ३८ मेट्रिक टन माल विमानाने रवाना झाला आहे.
एकूण आंबा निर्यातीमध्ये युरोपीयन देशांचा वाटा फक्त १० टक्के आहे. त्यामुळे युरोप बंदीचा बागुलबुवा न करता इतर पर्यायांना प्राधान्य देण्यात आले आहे. यावर्षीही आखाती देशांसह अमेरिका व इतर देशांमध्ये मोठ्याप्रमाणात निर्यात सुरू झाली असून निर्यातीमध्ये कोणतीही अडचण नाही.
- डॉ. सुधांशू,
उप महाप्रबंधक - अपेडा