आंब्याचा गोडवा अमेरिकेत!
By Admin | Published: June 26, 2016 04:49 AM2016-06-26T04:49:18+5:302016-06-26T04:49:18+5:30
वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून केशर, तोतापुरी या जातीचा एकूण १३ टन आंबा समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झाला. भारतीय आंबा निर्यातीच्या दृष्टिकोनातून
पुणे : वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून केशर, तोतापुरी या जातीचा एकूण १३ टन आंबा समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झाला. भारतीय आंबा निर्यातीच्या दृष्टिकोनातून अमेरिकेला समुद्रामार्गे निर्यातीची ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना असून, यामुळे भारतीय आंबा अमेरिकेच्या बाजारपेठेत स्पर्धा करू शकणार आहे.
राज्यात उत्पादित होणारा हापूस व केशर आंब्यास जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या २० वर्षांपासून भारतीय आंब्याला अमेरिकन बाजारपेठेमध्ये बंदी होती. सन २००६ मध्ये अमेरिकेने भारतीय आंब्याकरिता अमेरिकन बाजारपेठ काही अटी व शर्तींवर खुली केली. त्यामध्ये आंब्यावर निर्यातीपूर्वी विकिरण प्रक्रिया करण्याबाबत सूचित केले. कृषी पणन मंडळाने सुरवातीला लासलगाव येथील कृषक या विकीरण सुविधेचा वापर करून आंबा निर्यात निर्यातदारामार्फत सुरू केली होती. २०१६ पासून वाशी येथील विकीरण सुविधा केंद्रावरून मोठ्या प्रमाणात आंबा निर्यात सुरू करण्यात आली. या हंगामात आतापर्यंत १७५ टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून निर्यातदारांनी विमानमार्गे निर्यात केला आहे.
शुक्रवारी १३ टन आंब्याचा कंटेनर समुद्रामागे अमेरिकेला रवाना झाला. या वेळी अमेरिकन निरीक्षक प्रेम बालकरण, अपेडा मुंबईचे पी. पी. वाघमारे, सी. बी. सिंग, कृषी पणन मंडळाचे ओ. पी. नीला, डॉ. भास्कर पाटील, डी. एम. साबळे, सतीश वराडे, अभिमन्यू माने, सुशील चव्हाण आदी उपस्थित होते.
आंब्याचा कंटेनर १९ दिवसांत न्यूयॉर्क येथील बंदरात पोहोचून तेथे विक्रीचे नियोजन करण्यात आलेले आहे. मेक्सिको, फिलिपाईन्स, ब्राझील, हैती या देशांच्या आंब्याच्या तुलनात्मक दरात भारतीय आंबा ग्राहकास मिळणार असल्याने अमेरिकन बाजारपेठ मोठ्या प्रमाणात काबीज करता येऊ शकेल.