समिती निवडणुकीत हेराफेरी
By admin | Published: April 23, 2015 05:38 AM2015-04-23T05:38:03+5:302015-04-23T05:38:03+5:30
एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीच्या हेराफेरीचा फटका शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला आज
मुंबई : एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीच्या हेराफेरीचा फटका शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला आज बसला़ शेकापच्या उमेदवाराला मिळालेले सेनेचे मत
बाद ठरवून उपमहापौरांनी चिठ्ठी
टाकत भारिपचे अरुण कांबळे यांना विजयी ठरविले़ युतीच्या या दादागिरीविरोधात शेकापच्या उमेदवाराने कोर्टात जाण्याची तयारी केली आहे़
दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक उपमहापौर अलका केरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या प्रभागात युतीने भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अरुण कांबळे यांना पाठिंबा दिला़ तर काँग्रेस शेकापच्या हुसेन खैरनुसा यांच्या बाजूने उभे राहिले होते़ मात्र शेकाप उमेदवाराच्या नावापुढे शिवसेनेच्या मंजू कुमरे यांनी सही केली़ त्यामुळे शेकाप उमेदवाराला सर्वाधिक पाच मते मिळाली़
मात्र उपमहापौरांनी सेनेने शेकापला दिलेले मत अवैध ठरविले़ त्यामुळे तीनही उमेदवारांच्या खात्यात समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून अरुण कांबळे यांना अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले़ मंगळवारी एम पश्चिम प्रभागात असाच प्रकार घडला होता़ त्या वेळीस काँग्रेसचे अनिल पाटणकर यांचे सेना उमेदवाराला मिळालेले मत वैध ठरविण्यात आले़ त्यामुळे उपमहापौरांच्या या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे शेकापच्या खैरुन्निसा यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)