मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती एवढी एकच मागणी; शिवसेना प्रवेश झाला, पण मागणी पूर्ण झाली का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 01:59 PM2023-06-19T13:59:12+5:302023-06-19T14:00:28+5:30
या संपूर्ण घटनाक्रमात मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक खास मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी स्वतःच भाष्य केले आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच शिवसेनाउद्धव ठाकरे गटातील नेत्या तथा विधान परिषद सदस्य मनिषा कायंदे यांनी, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. मात्र या संपूर्ण घटनाक्रमात मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक खास मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.
काय होती मनिषा कायंदे यांनी एकमेव मागणी? -
कायंदे म्हणाल्या, "एकंदरीतच शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारधारा भरकटतेय. ती विचारधार, माझ्या मुळ हिंदुत्वाच्या विचारधारेपासून दिवसेंदिवस दूर जात आहे. ते कुठे तरी मनाला पटत नव्हते. मला इकडे कुठल्याही प्रकारचे आमिष दिलेले नाही. काही लोकांना वाटते की, माझी टर्म पुढच्याच महिन्यात संपणार आहे. पण असे नाही. माझी टर्म आणखी एक वर्ष आहे. २०२४ च्या निवडणुका होतील त्यानंतर कुणाला काय मिळणार? राजकारणात अशी अनेक वचनं दिली जातात. पण आपल्याला माहिती आहे. त्यात्या वेळी ज्या काही अडचणी असतात... त्यामुळे, मी एकनाथ शिंदे यांना सांगितले की, मला केवळ संघटनेत एक चांगले पद द्या, जेने करून मला मनमोकळे पणाने काम करता येईल."
...ही माझी खंत होती -
"उद्धव ठाकरे यांनी मला संभाजीनगरचे महिला संपर्क प्रमुख केले. विदर्भातही दोन जिल्हे दिले. पण माझ्यासारख्या एखाद्या वरिष्ठ व्यक्तीला जबाबदारी दिल्यानंतर एक ज्यूनिअर व्यक्ती तेथे येते आणि डिक्टेट करायला लागते. यासंदर्भात मी बोललेही, पण त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. ही माझी खंत होती. पण कार्यकर्त्यांना मनमोकळेपणाने बोलता यायला हवे. ही जी कुचंबना होते आणि ती झाली की माणून इकडे तिकडे बोलतो. मी सर्व नेत्यांसोबत बोलले होते.
माझे एकच होते की, माझे दोन वर्ष बाकी आहे. त्यामुळे मला अंगिकृत संघटनेचे काम द्या. अथवा महिला आघाडीचे काम द्या. मला काही तरी जबादारी द्या. जेव्हा पक्षातील लोक सोडून चालले आहेत आणि नवी लिडरशीप पुढे येऊ बघतेय, तेव्ही तुम्ही त्यांना काम करायची संधी द्या. आम्ही तुमच्यासोबतच होतो. मात्र असे झाले नाही.
विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी मी काही आटा-पिटा केला नव्हता -
मला विधान परिषदेचं सदस्यत्व दिलं, पण मी त्याच्या काही मागे लागले नव्हते. त्यासाठी मी काही आटा-पिटा केला नव्हता. पण शिवसेनेने मला तो मान सन्मानही दिला त्यासाठी मी आभारीच आहे. सभागृहाच्या आत असो वा बेहेर, मी पक्षाची भूमिका अत्यंत भक्कमपणे मांडली. काही गोष्टी पटत होत्या, काही पटत नव्हत्या, पण पक्ष प्रमुखांची साथ सोडायची नाही. हा विचार नेहमीच मनात होता.
कायंदेंना मिळाली मोठी जबाबदारी -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी मनिषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.