योग प्रचारासाठी मनीषा कोईराला मैदानात
By admin | Published: April 28, 2017 12:52 AM2017-04-28T00:52:58+5:302017-04-28T00:52:58+5:30
योगच्या प्रचार आणि प्रसारासाठी अभिनेत्री मनीषा कोईरालाही आता मैदानात उतरली आहे. समवेत ट्रस्टच्या माध्यमातून मुंबईसह
मुंबई : योगच्या प्रचार आणि प्रसारासाठी अभिनेत्री मनीषा कोईरालाही आता मैदानात उतरली आहे. समवेत ट्रस्टच्या माध्यमातून मुंबईसह देशात विविध ठिकाणी योग प्रशिक्षण शिबिरांतर्गत ती योग साधनेचा प्रचार आणि प्रसार करणार आहे.
मुंबई प्रेस क्लबमध्ये मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात बोलताना मनीषाने सांगतले की, ‘शारीरिक, मानसिक आणि मनाच्या सुदृढतेसाठी योग महत्त्वाचा आहे. कॅन्सरवरील उपचार पूर्ण केल्यानंतर, मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचले होते. मात्र, योगामुळे दोन्ही प्रकारच्या तणावातून बाहेर पडण्यास मला मदत झाली.’ महत्त्वाची बाब म्हणजे, कॅन्सर होण्याआधी केवळ सुडौल शरीरासाठी व्यायाम करत होते. आता सुडौल शरीरापेक्षा सुदृढ शरीरासाठी योग करत असल्याचे तिने आवर्जून सांगितले.
मुंबईसह मोठ्या शहरांतील हवा, पाणी आणि खाद्य हे दूषित झाले आहे. अशा परिस्थितीत शरीरासह मनाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग हा साधा आणि सोपा मार्ग आहे. कोणत्याही धर्मापुरता तो मर्यादित नसून, प्रत्येक नागरिकाने निरोगी राहण्यासाठी योग साधना करायलाच हवी, असा सल्लाही मनीषाने चाहत्यांना दिला.
दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त नेपाळमधील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून मनीषाने उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर, यंदाही खुल्या व्यासपीठावर येऊन योग प्रसार आणि प्रचाराचे आवाहन करणार असल्याचे तिने सांगितले. (प्रतिनिधी)