मंजुळा शेट्ये प्रकरण; हत्येची महिला आयोगाकडून दखल
By admin | Published: June 28, 2017 02:17 AM2017-06-28T02:17:07+5:302017-06-28T02:17:07+5:30
भायखळा महिला कारागृहात मंजुळा शेट्ये हिला तुरुंग प्रशासनाने विवस्त्र करून अमानुष मारहाण केली. त्यातच तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळा महिला कारागृहात मंजुळा शेट्ये हिला तुरुंग प्रशासनाने विवस्त्र करून अमानुष मारहाण केली. त्यातच तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला, या ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल राज्य महिला आयोगाने मंगळवारी घेतली. महिला आयोगाने मंजुळाच्या हत्येप्रकरणी सुमोटो दाखल करत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशी अहवालासह २९ जूनला हजर राहण्याचे आदेश अप्पर
पोलीस महासंचालक (कारागृह) यांना मंगळवारी देण्यात आले. अंडी व पावाच्या हिशेबावरून मंजुळाला अमानुष मारहाण करण्यात आली, त्यातच तिचा मृत्यू झाला. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी सविस्तर वृत्त दिले. त्यानंतर राज्य महिला आयोगाने प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोग प्रकरणाचा स्वतंत्र तपास करणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, सकृतदर्शनी हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. मंगळवारी सुमोटो दाखल करून घेण्यात आली आहे. प्रकरणाची कागदपत्रे, चौकशी अहवाल घेऊन २९ तारखेला हजर राहण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) भूषणकुमार उपाध्याय यांना देण्यात आले आहेत. त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यात येणार आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांच्या आधारे तपास केला जाणार आहे. गरज भासल्यास अन्य साक्षीदारांनाही चौकशीस बोलाविण्यात येणार आहे.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर आदेश
मंजुळावरील अत्याचाराबाबत तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरून ‘लोकमत’ने या प्रकरणाला वाचा फोडली. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) भूषण कुमार उपाध्याय यांना चौकशी अहवालासह २९ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले. राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव मंजुषा सुभाष मोळवणे यांनी पाठवलेल्या पत्रात तसा उल्लेख आहे.