भांडी घासल्यावर तनखय्या मंजिठियांना मिळाली माफी
By admin | Published: May 9, 2014 12:54 AM2014-05-09T00:54:00+5:302014-05-09T00:54:00+5:30
नांदेडच्या सचखंड हजूर साहिबांच्या लंगरमध्ये भाविकांनी भोजन केलेली भांडी घासून स्वच्छ केल्यावर तनखय्या करण्यात आलेले पंजाबचे महसूलमंत्री विक्रमसिंघ मंजिठिया यांना आरोपातून मुक्त करण्यात आले.
अमरिकसिंघ वासरीकर -
नांदेड नांदेडच्या सचखंड हजूर साहिबांच्या लंगरमध्ये भाविकांनी भोजन केलेली भांडी घासून स्वच्छ केल्यावर तनखय्या करण्यात आलेले पंजाबचे महसूलमंत्री विक्रमसिंघ मंजिठिया यांना आरोपातून मुक्त करण्यात आले. अमृतसर येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान २५ एप्रिल रोजी मंजिठिया यांनी उत्साहाच्या भरात भाषण करताना गुरुवाणीचा विपर्यास केला. यामुळे त्यांना तख्त सचखंड श्री हजूर साहिबच्या पंजप्यारे साहिबांनी तनखय्या घोषित केले व सदर आदेशाची प्रत मंजिठिया यांना पाठविण्यात आली. यावर त्यांनी आपला विनाअटी माफीनामा पाठविला. यावर पंजप्यारे साहिबांनी त्यांना स्वत: हजर राहून कैफियत मांडण्याचा आदेश दिला होता. गुरुवाणीचा विपर्यास केल्याबद्दल अकाल तख्त साहिब (पंजाब) च्या पंजप्यारे साहिबांनीही मंजिठिया यांना तनखय्या केले होते. त्यांना चारही तख्तांवर लंगर व जोडेघरची सेवा दंड स्वरुपात लावण्यात आली होती. एका खाजगी विमानाने मंजिठिया यांचे नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी साडेबारा वाजता आगमन झाले. १२.४५ वाजता ते पंजप्यारे साहिबांसमक्ष हजर झाले. त्यांनी विनाअट माफी मागितली. यावेळी गुरुद्वारा परिसरात युवकांनी मंजिठिया यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली व त्यांना गुरुद्वारा येथे जाण्यास विरोध केला. मंजिठिया यांनी विनम्रतेने सर्वांना हात जोडून माफ करण्याची विनंती केली. गुरुद्वारा परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जो शरण आवै तीस कंठलावै-गुरुवाणी
च्सचखंड येथे मंजिठिया पोहोचल्यानंतर त्यांना पंजप्यारे साहिबांनी दरबारसाहिबसमक्ष दुपारी दोन वाजता हजर राहण्याचे आदेश दिले. दरम्यानच्या काळात त्यांनी लंगरमध्ये भाविकांनी भोजन केलेली भांडी घासून स्वच्छ केली. त्यानंतर सचखंडच्या समोर असलेल्या चरणगंगा येथे उभे राहिले. मित जत्थेदार भाई ज्योतिंदरसिंघजी यांनी घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. च्प्रस्तुत प्रतिनिधीला मंजिठिया म्हणाले, माझ्या डोक्यावर खूप मोठा आरोप होता. गुरुचरणी माथा टेकल्यानंतर मी तणावमुक्त झालो आहे. माझ्याकडून अशी चूक भविष्यात होऊ नये व मी सदैव गुरुचरणी रहावे, अशी प्रार्थना मी दरबारसाहिबमध्ये केली.