मनोहर पर्रीकर म्हणतात, 'हवे तर तुम्हीही घ्या श्रेय'
By admin | Published: October 12, 2016 04:35 PM2016-10-12T16:35:45+5:302016-10-12T16:42:20+5:30
जे कोणी सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करत आहेत, ते देखील याचे श्रेय घेऊ शकतात, असा खोचक टोला पर्रीकर यांनी विरोधकांनी हाणला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे सत्ताधारी भाजपा राजकारण करत आहे, असे आरोप करणा-या विरोधकांना संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी खोचक टोला हाणला आहे.सर्जिकल स्ट्राईक कारवाईच्या श्रेयातील सर्वाधिक वाटा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचा आहे, असे वक्तव्य पर्रीकर यांनी केले आहे. मात्र, याचवेळी सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय देश आणि देशवासियांसोबत वाटण्यास माझी काहीही हरकर नाही, कारण ही कारवाई लष्कराने केली आहे, कोणत्याही राजकीय पक्षाने नाही, त्यामुळे जे कोणी सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करत आहेत, ते देखील याचे श्रेय घेऊ शकतात, असा खोचक टोला पर्रीकर यांनी विरोधकांनी हाणला आहे.
उरी हल्ल्याबाबत देशभरातून आक्रोश, संताप व्यक्त होत होता, यावेळी देशवासियांचा हा राग शांत करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक त्यावरचा उपाय होता, असेही पर्रीकर यांनी सांगितले. या कारवाईनंतर जनता समाधानी झाल्याचे दिसत असल्याची भावनादेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली. एकप्रकारे, सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करणा-या आणि भाजप याचे राजकारण करत आहे, असा आरोप करणा-यांना पर्रीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा सादर करण्याची मागणी केली होती. तर 'यूपीए सरकार सत्तेत असताना तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते, मात्र पाकिस्तानसोबत वाढता संघर्ष टाळण्यासाठी याबाबतची माहिती जाहीर केली नाही', असा दावा काँग्रेस पक्षाने केला होता. उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र, याच सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो आहे.