मॅनहोलच्या तुटक्या झाकणामुळे पाय मोडला, नोकरी गमावली, BMC ला दीड कोटीची नोटीस
By Admin | Published: January 9, 2016 02:59 PM2016-01-09T14:59:21+5:302016-01-09T14:59:21+5:30
रस्त्यावरच्या तुटलेल्या मॅनहोलमध्ये पाय गेल्याने एक माणूस जखमी झाला आणि परिणामी त्याला नव्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - रस्त्यावरच्या तुटलेल्या मॅनहोलमध्ये पाय गेल्याने एक माणूस जखमी झाला आणि परिणामी त्याला नव्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. या माणसानं मुंबई महापालिकेला नुकसानभरपाईपोटी दीड कोटी रुपयांची नोटीस बजावली असल्याची बातमी मुंबई मिररने दिली आहे. विजय हिंगोरानी, बिझिनेस स्ट्रॅटेजिस्ट आहेत आणि बेंगळूरमधल्या एका नोकरीसाठी त्यांना ऑफर आली होती.
२९ नोव्हेंबर रोजी ते वांद्र्याच्या कार्टर रोड येथील मॅनहोलमध्ये झाकण तुटलेलं असल्यामुळे पडले. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. दोन महिन्यांच्या या काळात त्यांना नव्याने मिळालेल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. त्यामुळे हिंगोरानी यांनी मुंबई महापालिकेला शारिरीक इजेपोटी आणि उत्पन्नाचे साधन गमावल्यापोटी दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाईची नोटीस बजावली आहे.
जानेवारी महिन्यामध्ये या नव्या नोकरीवर मला रुजू व्हायचं होतं असं हिंगोरानी म्हणाले. परंतु, पाय मोडल्यामुळे मी केवळ अंथरुणाला खिळलो नाही तर आर्थिक परिस्थिती बिकट झाली आणि त्यात भर म्हणजे नव्या नोकरीवर रुजू होणं अशक्य झाल्याने ती सोडावी लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
२२ डिसेंबर रोजी हिंगोरानी बेंगळूरला रवाना होणार होते आणि १ जानेवारी रोजी कामावर रूजू होणार होते. मुंबई महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात अशाचप्रकारे नागरिकांनी आवाज उठवायला हवा अशी अपेक्षा हिंगोरानी यांनी व्यक्त केली आहे.