मनोज जैनसह तिघांची जामिनासाठी धाव
By admin | Published: June 22, 2016 04:07 AM2016-06-22T04:07:24+5:302016-06-22T04:07:24+5:30
इफेड्रीन तस्करी प्रकरणी अटकेत असलेला एव्हान लाईफ सायन्सेसचा मुख्य संचालक मनोज जैन, राजेंद्र डिमरी, बाबा धोतरे या तिघांनी जामीनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली
ठाणे : इफेड्रीन तस्करी प्रकरणी अटकेत असलेला एव्हान लाईफ सायन्सेसचा मुख्य संचालक मनोज जैन, राजेंद्र डिमरी, बाबा धोतरे या तिघांनी जामीनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली. पकडलेला साठा हा दोन हजार कोटींचा नसून पोलिसांनी हा आकडा फुगवलेला आहे. तसेच इफे ड्रीनच्या रासायनिक तपासणीतही अंमली पदार्थ आढळले नसल्याचा दावाही त्यांच्या वकीलांनी न्यायालयात केला. तर सुशिल सुब्रमण्यम या आणखी एका फरारी आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. या सर्व अर्जांवरील सुनावणी आता सोमवारी होणार आहे.
ठाण्याचे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात आरोपींचे वकील अॅड. एन. एम. मोटे यांच्यासह तीन वकिलांनी त्यांची बाजू मांडली. एव्हॉन लाईफसायन्सेस लि. ही कंपनी नोंदणीकृत असून त्यांच्याकडे इफे ड्रीन बनविण्याचा परवान्यासह केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर, अन्न व औषध प्रशासन यांचे परवाने आहेत. शिवाय, ठाणे पोलिसांनी या कंपनीत छापा टाकून हस्तगत केलेले इफे ड्रीन हे दोन हजार कोटींचे नाही. पोलिसांनी हा आकडा फुगवलेला आहे. ते दोन ते चार हजार प्रति किलोने विकले जात असून त्याची एकूण किंमत पाच ते सहा कोटींच्या घरात आहे.
याशिवाय, टीएलसी तपासणी अहवालात ०.४५ इतक्याच प्रमाणात इफे ड्रीन मिळाले. तर आणखी एका तपासणीत त्याचे प्रमाण केवळ ०.०५ इतके आहे. कंपनीचा व्यवस्थापक या नात्यानेच सर्व कायदेशीर जबाबदारी मनोज जैन यांनी पार पाडल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
तर इफे ड्रीनचा माल गुजरातला पाठविण्यासाठी धोतरेची मदत घेतल्यामुळे त्याला अटक केली. मात्र, जो टेम्पो पोलिसांनी या कारवाईत दाखविला तो धोतरेच्या मालकीचा नसल्याचाही दावा करण्यात आला. शिवाय, इफे ड्रीनच्या इतरकाही प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी आरोपींना जामीन दिल्याचाही हवाला देऊन आपल्याही जामीन देण्याची मागणी केली.
अर्थात, कंपनीतून इफे ड्रीनच हस्तगत केले असून त्यापासून वेगवेगळे अंमली पदार्थ बनविले जात असल्याचा दावा पोलिसांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)