"मनोज जरांगेंनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा...", प्रसाद लाड यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 11:29 PM2024-03-03T23:29:46+5:302024-03-03T23:31:16+5:30
Prasad Lad : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले.
Prasad Lad (Marathi News) मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, आजही देवेंद्र फडणवीस यांनी आपला घात केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले.
मनोज जरांगे पाटील यांनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रसाद लाड म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा नौटंकी सुरु झाली आहे. ते पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करु लागले आहेत. ते वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळे ते फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवत आहेत. यापूर्वीही मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची होती. आतादेखील ते शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत आहेत. शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज सरकारसोबत आहे. मनोज जरांगे अशीच बडबड करत राहिले, तर समाज त्यांना नक्कीच जागा दाखवेल, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. छगन भुजबळ म्हणाले," कोण कशाला जरांगेंचा घात करतील. एका क्षणी हॉस्पिटलमध्ये असतो, मग तो तिकडे आंतरवली सराटीला जातो. नंतर परत म्हणतो की माझ्या छातीत दुखू लागलं. परत चालला हॉस्पिटलला. त्याचं नाटक सगळ्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण मराठा समाजाला लक्षात आलं आहे. आपण सगळं केलं मराठा समाजाला आरक्षण दिलं. नवी नोकरभरती आहे, त्यात मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचे जीआर निघाले आहेत. सगळं करुनही मनोज जरांगे ऐकत नसतील तर काय बोलणार? हे मारुतीचं शेपूट आहे, ते वाढणार आहे. प्रसिद्धीची नशा चढते आणि ती कधीच प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते", असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्यास आजपासून सुरुवात झाली आहे. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे, हा प्रयोग संभाजीनगरवरून होणार होता. महिला कार्यकर्त्यांच्या आडून, एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचं काम नाही, तुम्हाला हे शोभत नाही. फडणवीस यांनी पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यात मराठा द्वेष ठासून भरलेला आहे. त्यांच्या सांगण्याबरून बॅनर बोर्ड काढले जात आहेत. पोलीस बोर्ड काढत आहेत, बोर्ड का काढलेत, त्यात गोळ्या घाला लिहिले आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे.