राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप; काय म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 02:27 PM2024-09-18T14:27:17+5:302024-09-18T14:27:48+5:30
सरकारने सगळ्या मागण्या तातडीने मंजूर कराव्या. तिनही गॅझेट 2-4 दिवसांत लागू करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. मला राजकीय वळणावर जायला भाग पाडू नका, ही फडणवीस यांची जबाबदारी आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मला राजकीय बोलायचे नाही. मी आता राजकीय भाषा बोलणार नाही. फडणवीस साहेबांना संधी दिली, अशी एक दिवस आधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घोषणा केली होती. परंतू, आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
सरकारने सगळ्या मागण्या तातडीने मंजूर कराव्या. तिनही गॅझेट 2-4 दिवसांत लागू करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. मला राजकीय वळणावर जायला भाग पाडू नका, ही फडणवीस यांची जबाबदारी आहे. मला राजकीय भाषा बोलायची नाही. ज्याची कुणबी नोंद निघाली त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावे. ईडब्ल्यूएसमधून भरलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले जात आहे, हे योग्य केले जात नाही. मराठ्यांचे कल्याण न होण्यासाठी फडणवीस पूर्णपणे दोषी आहेत. गरीब मराठ्यांवर अन्याय करणारे फक्त फडणवीस आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला.
तसेच माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग पाडा पाड्या कशा झाल्या याबाबाबत माझ्या नावाने ओरडू नका. मला राजकीय वाटांवर फडणवीस यांनी जाऊ देऊ नये. किती दिवस झाले नुसते प्रक्रिया सुरू आहे म्हणूनच सांगत आहात. 7 महिने प्रक्रिया सुरू असते का? मला मूर्ख समजता काय? 2-4 दिवसांमध्ये आमच्या मागण्यांचे तुकडे पाडा, मी रस्त्यावर आलो तर तुमचा खेळ खल्लास होईल, असा इशारा जरांगे यांनी फडणवीस यांना दिला.
जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तुमचे राजकीय करीअर उध्वस्त करेन, अशी धमकीही जरांगे यांनी फडणवीस यांना दिली. भारतात अशी जात नाही की जिने वर्षभर सरकारला सहकार्य केले. आम्ही सहकार्यच केले. आता सरकारला लाज वाटायला हवी. 2-4 दिवसांत सगळ्या विषयाची अंमलबजावणी करावी. फडणवीसांनी कितीही गणिते करू द्या सगळे गणित मोडून टाकणार. फडणवीस हेच सगळ्यांच्या आरक्षणाला अडथळा आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला.