मनोज जरांगेंनी सुद्धा निवडणूक आजमवायला हरकत नाही; छगन भुजबळांनी दिला हा तर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 11:50 AM2024-10-20T11:50:41+5:302024-10-20T11:57:57+5:30
Chagan Bhujbal on Manoj Jarange: मनोज जरांगे आपले उमेदवार देण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. परंतू, मराठा आरक्षणाला ओबीसींतून आरक्षण देण्यास विरोध करणारा ओबीसी समाजही या निवडणुकीवर बऱ्यापैकी वर्चस्व गाजविणार आहे.
विधानसभा निवडणुकीची तयारी दोन्ही आघाड्या जोरात करत आहेत. अशातच तिसरी आघाडी निर्माण झाली असून ती देखील पेटून उठली आहे. लोकसभेला भाजपाला फटका बसलेले मराठा आंदोलन पुन्हा एकदा विधानसभेला राजकीय पक्षांची गोची करण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे आपले उमेदवार देण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. परंतू, मराठा आरक्षणाला ओबीसींतून आरक्षण देण्यास विरोध करणारा ओबीसी समाजही या निवडणुकीवर बऱ्यापैकी वर्चस्व गाजविणार आहे.
यातच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढविण्याच्या शक्यतेवर आपले मत व्यक्त केले आहे. ही लोकशाही आहे. मनोज जरांगे जी भूमिका घेतील ते घेतील, मला तर असे वाटते की त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजेत. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. कितीतरी पक्ष निर्माण झालेले आहेत. त्यांनी सुद्धा आजमवायला हरकत नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
समीर भुजबळ माझ्याबरोबर आहेत, अजित पवारांबरोबर आहेत. आम्ही काम करत आहोत, असे स्पष्ट करतानाच शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास किंवा महायुतीत काही सीटांवर घासाघिस चालूच राहील, असे संकेत भुजबळांनी दिले आहेत. अनेक नेते फॉर्म पण भरतील, शेवटच्या वेळी काहीजण फॉर्म परत घेतील. मग खरी निवडणुकीची लढाई सुरू होईल, असे मत भुजबळांनी व्यक्त केले.
लाडकी बहीण योजना तात्पुरती स्थगित केल्यावरून भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. फार थोडेसे लोक राहिले आहेत बाकी सगळ्यांचे पैसे अकाउंटमध्ये गेलेले आहेत. 98 टक्के पेक्षा जास्त आमच्या महिला भगिनींना पैसे मिळालेले आहेत. ही आमची रेगुलर स्कीम आहे निवडणुकीसाठी असलेली स्कीम नाही, असेही भुजबळ म्हणाले.