६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 10:47 AM2024-04-14T10:47:59+5:302024-04-14T10:48:56+5:30
Manoj Jarange Patil : मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सर्व राजकीय पक्षांचा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. ६ जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिसे नाही तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार आहे. तसेच, मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
"डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. आम्ही यंदा राजकारणात नाही. उमेदवार दिला नाही किंवा कोणाला पाठिंबा दिला नाही. मात्र ६ जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिले तर पुन्हा उपोषण करणार आहे. तसेच, मराठा समाज विधानसभेची तयारी करणार", अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
याचबरोबर, महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. आज देऊ, उद्या देऊ असे करून सात महिने झाले. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे. इतके प्रेम उफाळून येते की, त्यांचं की सांगता येत नाही. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. मात्र, गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केली.