Manoj Jarange मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उपोषण स्थगित करणार; म्हणाले, "हातपाय दाबून धरले अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 10:31 AM2024-07-24T10:31:36+5:302024-07-24T10:36:36+5:30
Manoj Jarange Patil : सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत १३ आगस्टपर्यंत मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे.
जालना : सगेसोयरेची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र, आज मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती दिली आहे. तसंच सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत १३ आगस्टपर्यंत मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मनोज जरांगे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी देत यामागील कारणही त्यांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे म्हणाले, रात्री माझी तब्येत खालावल्याने मराठा बांधवांना काळजी लागली होती. त्यामुळे ४० जणांनी माझे हातपाय दाबून धरले आणि मला सलाईन दिली. त्यांची माया आहे म्हणून त्यांनी तसं केलं. माझं कुणीही ऐकलं नाही. आम्हाला आरक्षण पण पाहिजे आणि तुम्ही पण पाहिजे असं समाजाचं म्हणणं होतं, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
आमरण उपोषणाच्या शक्तीला सरकार घाबरतं. पण आता सलाईन लागल्यामुळं उपोषणाचा काही उपयोग नाही. मी सलाईन लावून उपोषण करणारा माणूस नाही. आता सलाईन लागलीच आहे, तर आता उपयोग नाही. सलाईन ही जेवणासारखीच आहे. त्यामुळं आता उपोषणाची मानसिकता राहिली नाही. सलाईन लावली म्हणजे उपोषणाला आता अर्थ नाही. त्यामुळं आज दुपारी मी माझं उपोषण सोडणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे, ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल. सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही. मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही, असं मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलं.
याचबरोबर, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याची घोषणा करताना राज्य सरकारला पुन्हा १ महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या १३ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसंच, सरकारतर्फे कुणीही आलं नाही. कारण आता सरकारकडे मंत्रीच उरले नाहीत. अनेकजण आधीच आले. अशात आता पुन्हा कोणत्या तोंडाने जायचं हा विषय असेल, असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे कोर्टानं मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. यावर देखील मनोज जरांगे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्वाचे विचार दाखवण्यासाठी आम्ही नाटकाचे काम केलं होतं. त्यात आम्हाला तोटा झाला. नाटकातील पैसे काही जणांनी चोरले. त्यात माझा तिळभरही हात नव्हता, असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्याविरोधात अटक वॉरंट काढणं हा सर्व देवेंद्र फडणवीस यांचा खेळ आहे. मला जेलमध्ये टाकून त्यांचा मारण्याचा प्रयत्न आहे. बारा तेरा वर्षापूर्वीच वॉरंट आताच का निघालं? असा सवाल त्यांनी केला आहे.