आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:30 PM2024-09-19T17:30:41+5:302024-09-19T17:33:20+5:30
मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आपल्या मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात आमरण उपोषण सुरु केलं आहे. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे, ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भाऊसाहेब जरांगे यांनी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही त्यांची भेट झाली. यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनेक शेतकरी देखील होते. राज्य सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही तर आंदोलन करू, असा इशारा भाऊसाहेब जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्यात एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सगे सोयऱ्यांसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करत आहेत. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. यातच आता मनोज जरांगे पाटील यांचे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारची आणखी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहेत. सरकार जरांगे बंधूंची मनधरणी करण्यात आता कितपत यशस्वी होतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.