“टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही”; जरांगेंची भुजबळांवर पुन्हा टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 10:23 AM2023-11-24T10:23:50+5:302023-11-24T10:28:14+5:30
Manoj Jarange Patil And Chhagan Bhujbal: अजित पवारांना सांगतो की, ते शांत बसले नाही तर मीही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.
Manoj Jarange Patil And Chhagan Bhujbal: गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच वाढताना दिसत आहे. ही टीका अधिकाधिक वैयक्तिक होताना पाहायला मिळत आहे. यातच आता, अजित पवारांना सांगणे आहे की ते शांत बसले नाहीत तर मीही शांत बसणार नाही. टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, म्हातारा झाला असला तरी खूप गडबड चालू आहे, या शब्दांत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा नाव न घेता हल्लाबोल केला.
मनोज जरांगे पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. विविध ठिकाणी जाऊन भेटी-गाठी घेत आहेत. मनोज जरांगे यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यातच छगन भुजबळ यांनी अंबड येथील सभेतून मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. मनोज जरांगे यांनीही शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले. यानंतर दोघांमधील वाद वाढताना दिसत आहे. एका बैठकीत ठरले. सगळ्या मंत्र्यांना तंबी दिली आहे की, जातीय तणाव निर्माण व्हायला नको. फक्त मनोज जरांगे पाटील यांनी कुणाचा एकेरी उल्लेख करु नये. मी शांत बसलो होतो तेव्हा येवल्यातील बोर्ड त्याने फाडले. मग मी कसे काय शांत बसू? असा उलटप्रश्न मनोज जरांगे यांनी केला आहे.
मी काही बोललो नव्हतो, तरीही अंबडच्या सभेत तो का बोलला?
मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील टीका एकेरीवर आल्याचे दिसत आहे. मी २०-२५ दिवस गप्प बसलो होतो. मी काही बोललो नव्हतो. तरीही अंबडच्या सभेत तो का बोलला? वय झाले आहे त्यामुळे माणसाला पचत नाही. खायची सवय लागली आहे. महाराष्ट्र सदन, जनतेचा पैसा सगळे ओरबाडून खाल्ले आहे. अजित पवार यांनाही सांगतो आहे जर ते शांत बसले नाही तर मी शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माझे हेच सांगणे आहे. कायदा पाळणे हे त्यांचेही काम आहे. कार्यकर्त्यांना सांगून आमचे बोर्ड फाडणे बंद करायला सांगा, अशी तंबी मनोज जरांगे यांनी दिली.
दरम्यान, ओबीसीमधील सामान्य लोकांना वाटते की, पुरावे मिळाले असतील तर मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे, आपल्या नेत्यांनी गप्प बसले पाहिजे. हा खातो किती? याला पुरेनाच. अरे किती खातो? अनेक दिवसांपासून एकटाच खातो आहे. मुकादम चांगला नाही, त्याला घरी बसवणार आहे, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला.