“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 10:10 AM2024-05-24T10:10:19+5:302024-05-24T10:10:43+5:30

Manoj Jarange Patil: माझ्यावर एसआयटी नेमली. गुन्हे दाखल करून तडीपार करतील. दुसऱ्या राज्यात गेलो तरी तिथे मराठ्यांना बोलावून मोर्चे काढणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

manoj jarange patil criticized again chhagan bhujbal over maratha reservation | “तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका

“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका

Manoj Jarange Patil: ४ जूनला सगळ्यांनी अंतरवाली सराटीकडे या. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. उपोषण मागे घेण्याचा आग्रह कोणीही करू नका. कोट्यवधींच्या संख्येने मराठ्यांनी एकत्र यावे. मॅनेज होत नाही हे समजल्यानंतर सरकारने डाव रचला.  कोणत्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात ते बघू, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील मतदानाचे सर्व टप्पे झाल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी एल्गार केला असून, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हाटत नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे.

एका सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तो येवल्यावाला म्हणतो की आम्ही एकटे ६० टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो की काय? त्यानंतर म्हणे एसटी फुल भरलेली आहे. मी म्हटले मला दार उघडू दे. तू ते एसटीमध्ये एकटाच तंगड्या लांबून बसलाय तुला तंगडी सकट बाहेर ओढतो. तुझी नियत चांगली नाही, तुला फक्त खायची सवय लागली आहे. ओबीसी महामंडळ ८० टक्के खाऊन घेतले. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. त्याचाच सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाला विरोध आहे. वंजारी आणि धनगर बांधवांच्या आरक्षणाचा धक्का लागत नाही, तरीही तुम्ही त्यांना तुमच्या सभेला बोलावता. धनगर आणि मुस्लिम बांधवांना ही आरक्षण कसे मिळत नाही हे बघतो, असे सांगत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.

कारण शेकडो नोंदी त्यांच्या सापडलेल्या आहे

ओबीसीमधून आरक्षण मागितले तर दंगली होतील, असे मला काही जण म्हणत होते. मात्र लढा यशस्वी व्हायला आला की हे लोक भीती दाखवत असतात. दोनशे वर्षाच्या नोंदी सापडल्या. सगळ्यात ओरिजनल ओबीसी कोण आहे ते म्हणजे मराठा, कारण शेकडो नोंदी त्यांच्या सापडलेल्या आहेत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. आमच्या हक्काचे आरक्षण असून, तुम्ही असे म्हणताय की ओबीसी विरुद्ध मराठा वाद होतो. आमचे आहे म्हणून द्या म्हणतो, कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागत नाही आणि वाद व्हायचा प्रश्नच येत नाही, असे जरांगे म्हणाले.

दरम्यान, सरकारने माझ्याविरुद्ध अटक करण्याचा डाव रचला, माझ्यावर एसआयटी नेमली. आता हे जेलमध्ये टाकतील. रोज माझ्यावर दोन-तीन गुन्हे दाखल करतील. रात्रीतून तडीपार करायचे आहे. तडीपार होऊन दुसऱ्या राज्यात जरी गेलो तरी या राज्यातील मराठे त्या राज्यात बोलावून मोर्चे काढणार, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: manoj jarange patil criticized again chhagan bhujbal over maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.