“धनंजय मुंडेंना आरोपी करा, माझ्या नादी लागू नका सोडणार नाही, सत्य कधी...”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:43 IST2025-03-27T15:42:31+5:302025-03-27T15:43:45+5:30
Manoj Jarange Patil News: अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना वाचवायला नको होते, पाठीशी घालू नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

“धनंजय मुंडेंना आरोपी करा, माझ्या नादी लागू नका सोडणार नाही, सत्य कधी...”: मनोज जरांगे
Manoj Jarange Patil News: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीला सुरुवात झाली असून या प्रकरणातील दुसरी सुनावणी कोर्टात पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात सुरुवातपासून नेमके काय घडले आणि कोणत्या आरोपीचा काय रोल आहे, याची माहिती कोर्टासमोर मांडली. तसेच दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या सुदर्शन घुले याच्यासह जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनी पोलिसांकडे हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा इशारा दिला आहे.
आता हे प्रकरण आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले. मात्र कागदपत्रे न मिळाल्याने आरोप निश्चित करण्यात येऊ नये, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे. दुसरीकडे, पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यात संतोष देशमुख हे मुख्य अडथळा होते. तसेच प्रतिक घुलेच्या वाढदिवशीच त्यांनी आणि मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी पवनचक्की कंपनीच्या बाहेर आम्हाला मारहाण केली. त्याचे व्हिडिओ व्हायरल केल्याने आम्ही हे पाऊल उचलले, अशी कबुली सुदर्शन घुले याने दिल्याची माहिती आहे. देशमुख यांच्या हत्येआधी हॉटेल तिरंगा इथे विष्णू चाटेसोबत बैठक घेतल्याचेही घुलेने कबूल केले. मनोज जरांगे पाटील बीड संतोष देशमुख प्रकरणाच्या बाबतीतही अतिशय सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. मराठा आरक्षण आणि बीड प्रकरण या दोन्ही मु्द्द्यांवरून ते सातत्याने महायुती सरकारवर टीका करत आहेत.
माझ्या नादी लागू नका, सोडणार नाही
सत्य कधीच झाकत नाही, तुम्ही किती प्रयत्न केले तरी नियतीला मान्य नसते. त्या लोकांनी कोणासाठी केले तर ते धनंजय मुंडे यांच्यासाठीच. धनंजय मुंडे यांची ही संघटित गुन्हेगारी आहे, कुठे खंडण्या वसूल करायच्या, हा पैसा धनंजय मुंडेंना दिला जायचा. हत्याप्रकरणातील एक नंबरचा आरोपी टोळी तयार करून अशी कृती करत होता. एक नंबरच्या आरोपीनेच खंडणीसाठी खून करायला लावल्याचे सिद्ध झाले. धनंजय मुंडेनेच मोर्चे काढायला लावले, रस्ता रोको आंदोलन करायला लावले. माझा संबंध नसताना माझ्या फोटोला धनंजय मुंडेनीच चपला हाणायला लावला. तुम्ही असे कितीही कृती केले तरी नियतीला मान्य नसते. तुम्हाला याचे फळ मिळाले, माझ्या नादी लागू नका, इथून पुढे माझ्या नादी लागल्यास मी सोडणार नाही, अशा शब्दात जरांगेंनी थेट आमदार धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे.
दरम्यान, सरकारने धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाचवायला नको होते. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात ही बैठक झाली, त्यामुळे ३०२ मध्ये धनंजय मुंडे आरोपी होतात आणि झालेच पाहिजे. गृहमंत्र्यांनी ते करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.