“फडणवीसांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले, आता सुट्टी नाही; हिशोब घ्यायचा”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 06:09 PM2024-09-13T18:09:41+5:302024-09-13T18:11:57+5:30
Manoj Jarange Patil News: हैदराबाद गॅझेट लागू करायला अडचणी काय आहेत? ही अडवणूक कशाला? अधिवेशन घ्या, जो आमदार बोलणार नाही, त्याला पाडायचे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
Manoj Jarange Patil News: आता फूट पडू द्यायची नाही. कोणत्याही नेत्याला घाबरायचे नाही. एका-एका काठीचा हिशोब घ्यायचा, आता सुट्टी नाही. माझ्या विरोधात खूप टोळ्या आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले आहेत. ही त्यांची चाल आहे. मराठा का संपवायला निघाला आहात का, असा थेट प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
घोंगडी बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या आहेत. भावनिक केले जाणार आहे. प्रत्येक राजकीय नेता पक्ष वाचवण्यासाठी निघाला आहे. अफाट संपत्ती केवळ मराठा समाजाच्या जीवावर आहे. हेच लोक मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत. आरक्षणावर कोणीच बोलायला तयार नाही. सगे सोयरेची अधिसूचना काढली, आठ महिने झाले तरीही अंमलबजावणी नाही. हैदराबाद गॅझेट लागू करायला अडचणी काय आहेत? ही अडवणूक कशामुळे सुरू आहे, अशी रोखठोक विचारणा मनोज जरांगे यांनी केली.
मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही ही सर्वांची इच्छा आहे
मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, ही सर्वांची इच्छा आहे. हा समाज बलाढ्य आहे. समाज प्रगत होईल म्हणून आरक्षण मिळू द्यायचे नाही. अनेक जणांनी देव पाण्यात ठेवले आहेत. राजकीय पक्षातील लोक आपल्यात फूट पाडत आहेत. देवेंद्र फडणवीस सर्व चालवतात, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही मागतो. सरकारने अधिवेशन बोलवावे, जो आमदार बोलणार नाही त्याला पाडायचे. अधिवेशन बोलवायचे, मग समाज बघेल कोणता आमदार बोलणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठे जे मागतात ते तुम्ही देत नाही आणि जे आम्ही मागत नाही ते तुम्ही देता, यात आमची चूक काय आहे? ईडब्लूएस रद्द करण्याचा घाट का घातला? सरकार याचे उत्तर देत नाही. १०६ आमदार मराठ्यांनी निवडून दिले आहेत. आम्ही आमचे आरक्षण मागत आहोत. माझे कर्तव्य पार पाडत आहे. सरकारला मॅनेज होत नाही. त्यांनी माझ्याविरोधात आंदोलन उभे केले आहे. मी एकटा वटणीवर आणतो, असे जरांगे म्हणाले.