“धनंजय मुंडे गुंडांच्या टोळीच्या जीवावर उभे, स्वतःचे पाप झाकायला ओबीसींचा आसरा”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:31 IST2025-01-09T16:30:47+5:302025-01-09T16:31:50+5:30
Manoj Jarange Patil News: धनंजय मुंडे, आपण कुणाला घाबरत नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येतील एकही आरोपी सुटला तर सरकारची आमच्याशी गाठ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

“धनंजय मुंडे गुंडांच्या टोळीच्या जीवावर उभे, स्वतःचे पाप झाकायला ओबीसींचा आसरा”: मनोज जरांगे
Manoj Jarange Patil News: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यानंतर आता धनंजय मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. यातच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या दिल्यानंतर आपण त्या गुंडांच्या विरोधात बोललो. तर आपल्यावरच केसेस दाखल करण्याचे षड्यंत्र केले जात आहे. हे काम धनंजय मुंडे यांच्या लाभार्थी बगलबच्च्यांचे आहे. तुमच्या लाभार्थी टोळींना आंदोलने करायला लावता, आरोपीच्या मागे उभे राहता. हे चुकीचे नाही का? जर आरोपीला साथ द्यायचे असे झाले तर राज्यात इतर ठिकाणीही असेच प्रकार घडतील, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला.
धनंजय मुंडे गुंडांच्या टोळीच्या जीवावर उभे, स्वतःचे पाप झाकायला ओबीसींचा आसरा
सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येतील एकही आरोपी सुटला तर सरकारची आमच्याशी गाठ आहे. धनंजय मुंडेंनी जे प्रयोग सुरू केलेत, षड्यंत्र आखलेत, त्यामुळे त्यांचे पाय अजून खोलात जातील. धनंजय मुंडे हे त्यांच्या गुंडांच्या टोळीच्या जीवावर उभे आहेत. धनंजय देशमुखांना जर कुणी धमकी देत असेल तर त्याला सोडणार नाही. गुंडांना बोलायचे नाही का? आम्ही कुणाच्या जातीला धमकी दिली नाही. पण नेत्याला आम्ही सोडणार नाही. स्वतःचे पाप झाकण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतला जात आहे. पाप करणार तुम्ही, आणि ओबीसींच्या मागे उभे लपायचे. धनंजय मुंडेंनी पीक विमा खाणाऱ्या, राख खाणाऱ्या टोळ्या आणल्या. या नासक्या पाच पन्नास लोकांनी त्यांच्या जातीची बदनामी केली, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
दरम्यान, संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात हजार केसेस जरी दाखल झाल्या तरी मागे हटणार नाही. धनंजय मुंडे, आपण कुणाला घाबरत नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.