मराठ्यांना चारही बाजूनं पडलेला वेढा मोडून काढायचं; मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 03:41 PM2023-11-17T15:41:20+5:302023-11-17T15:47:30+5:30

मराठ्यांची लेकरं पुढे जाऊ नये असा चंग बांधला आहे. यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही. आमचे आरक्षण ७० वर्ष खाल्ले आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil criticized OBC leaders over Maratha reservation | मराठ्यांना चारही बाजूनं पडलेला वेढा मोडून काढायचं; मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

मराठ्यांना चारही बाजूनं पडलेला वेढा मोडून काढायचं; मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

सांगली - मराठ्यांची ताकद आज राज्याला दिसतेय. चारही बाजूने मराठ्यांना घेरलं जातंय, आपल्याला हे षडयंत्र मोडून काढायचं, सावध राहा, गाफील राहू नका, ७० वर्षापासून मराठ्यांना वेढा पडलाय, हा वेढा तोडायचा आहे. आज समितीला पुरावे सापडले आहे. मराठा ५० टक्क्यांच्या आतमध्येच आहे. मराठा ओबीसी आरक्षणात आहे हे सिद्ध झालाय, ओबीसी प्रवर्गात सामाविष्ट व्हायचे असेल तर कुठल्याही जातीला निकष पूर्ण करावे लागतात. मराठा समाजाने हे सर्व निकष पूर्ण केलेत. विदर्भात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश केला. व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, त्यावर आरक्षण मिळाले असेल तर आमचाही व्यवसाय शेती आहे असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता इथून पुढच्या काळात आपल्या लेकरांचे वाटोळे होऊ द्यायचं नाही. आपल्या मुलांना सावली मिळण्यासाठी आज आपल्याला उन्हात बसावं लागेल. सांगलीत प्रचंड संख्येत जमलेल्या लोकांनी मराठ्यांची एकजूट दाखवली. एकजुटीशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजाला माझं आवाहन आहे, की, आता एकजूट दाखवण्याची गरज आहे. बिगर कामाचे कळप एकत्र यायला लागलेत. आपली जात वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठी आरक्षण असलेल्या आणि नसलेल्या मराठा बांधवांनी ताकदीनं एकजूट दाखवा. मी मराठा समाजाला पाया पडून विनंती करतो. आपल्याला आव्हान पेलायचं आहे. स्वत:च्या लेकरांच्या हितासाठी लढायचे आहे. आपली जात उद्ध्वस्त होता कामा नये. पोरं संपली जर जात संपली, पोरांचे करिअर बर्बाद होऊ देऊ नका. आजपासून प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुमची जात ओबीसी आरक्षणात गेली, ती कुठल्या आधारे गेली हे सांगा. या राज्यात मराठ्यांची त्सुनामी आलीय. एवढ्या ताकदीने समाज आज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षण नसलेल्या भावाच्या मदतीला ज्या मराठ्यांना आरक्षण मिळालंय त्यांनी मदतीला या. आपल्याला लढून वेढा तोडायचा आहे. माझ्या सांगण्याकडे मराठा समाजाने बारकाईने लक्ष द्या, आम्ही संपलो तर उद्या मराठ्यांना संपवायला मागेपुढे पाहणार नाही. मराठ्यांची लेकरं पुढे जाऊ नये असा चंग बांधला आहे. यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही. आमचे आरक्षण ७० वर्ष खाल्ले आहे. ज्या ज्या वेळी समिती झाल्या तेव्हा प्रत्येक समितीने पुरावे दिले. परंतु तरीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही. मराठ्यांच्या ताकदीवर हे पुरावे आता समोर आलेत. मराठ्यांना आरक्षण मिळाले असते तर सर्वात प्रगल्भ जात मराठाच राहिली असती असा विश्वासही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात पुरावे सापडतायेत. मराठ्यांच्या आंदोलनामुळे लेकरांना भाकरी मिळणार आहे. एकही राजकारणी आपल्या मदतीला येणार नाही. आपल्याला आपलाच लढा उभारावा लागणार आहे. आपण या नेत्यांना मोठे केले. राज्यातला एक पक्ष, एक नेता असा नसेल ज्यांना मराठ्यांनी मोठे केले नाही. आमच्या लेकराला मदत पडेल या विचाराने आमच्या बापजाद्यांनी यांना मोठे केले. परंतु आज आपल्या लेकरांना त्यांच्या मदतीची गरज आहे परंतु एकही राजकीय नेता मराठ्यांच्या मदतीला येत नाही असा आरोपही जरांगे पाटील यांनी राजकीय पुढाऱ्यांवर केला आहे. 

Web Title: Manoj Jarange Patil criticized OBC leaders over Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.