“शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 20:39 IST2025-03-30T20:37:38+5:302025-03-30T20:39:06+5:30

Manoj Jarange Patil News: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, सरकारला थेट इशारा दिला आहे.

manoj jarange patil criticized state govt over farmers loan waiver issue | “शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल”: मनोज जरांगे

“शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: बीड प्रकरण, परभणी प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलची आक्षेपार्ह विधाने, अशा काही मुद्द्यांवरून विरोधक महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून, सातत्याने महायुती सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच आता शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका विधानावरून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. राज्यातील जनतेला सांगतो की, ३१ तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितले होते, ते प्रत्यक्षात सध्या तरी येताना दिसत नाही. आता तशी परिस्थिती नाही, भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. आत्ता आपली परिस्थिती नाही, असे अजित पवारांनी सांगितले. यावरून आता मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.

शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल

अजित पवार म्हणत असतील की, आम्ही कर्जमाफी देणार नाही. तर, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नसतील तर यांच्याकडे बघावे लागणार आहे. त्यांना गावात यायचे बंद करावे लागेल, ती मोहीम मला सुरू करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला जात नाही. शेतकऱ्यांचा पीक विमा दिला जात नाही. नुसते पंचनामे केले जातात. अनुदान दिले जात नाही. शेतकऱ्यांची घोर फसवणूक सुरू आहे. विरोधकही आमचा नाही आणि सत्ताधारी आमचे नाही. मराठ्यांच्या आरक्षणाने एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट दाखवण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, तर आमचे म्हणणे आहे की, शेतकऱ्यांची कर्जमुक्तीच करा. परंतु, तसे होणार नसेल, तर आता पुढच्या काळात यांच्याकडे पाहावे लागले, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, या दादांच्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच समाचार घेत दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला. मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले असून लघू, छोटे व मध्यम उद्योग देशोधडीला लागले. नोटबंदी व जीएसटी नंतर या व्यवसायाला अवकळा आली. निवडणुकीच्या प्रचारात व जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये आदी अनेक आश्वासन दिले होते. मात्र १०० दिवसातच महायुतीच्या सरकारला याचा विसर पडला, अशी टीकाही त्यांनी केली.

 

Web Title: manoj jarange patil criticized state govt over farmers loan waiver issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.