माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच...; मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 05:50 PM2023-11-22T17:50:16+5:302023-11-22T17:50:51+5:30
जातीजातीत दंगली भडकवण्याच्या भाषा तुम्ही केली. परंतु मराठे राज्यात जातीय दंगली होऊ देणार नाही असा विडाच आम्ही खांद्यावर उचलला आहे असं जरांगे म्हणाले.
नाशिक - २०२३ चा मराठ्यांचा लढा उभा राहिला आणि कुणबी नोंदीचे पुरावे सापडले. मराठा समाजाचे लेकरं हुशार असूनही आरक्षण नसल्याने उच्च पदावर जाण्याऐवजी छोट्या छोट्या पदावर काम करावं लागले. ज्यांची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ मराठा मुलांवर आली.माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच. जनतेचे पैसे तुम्ही खाल्ले, महाराष्ट्र सदनासह सर्व लुटले म्हणून तुम्ही जेलमध्ये गेला. लोकांचा तळतळाट लागला. ज्यांची लायकी नाही त्यांचे नाव मी घेत नाही. अगोदर त्यांच्या विचाराला आमचा विरोध होता. व्यक्ती म्हणून नको. माझा प्रामाणिकपणा समाजाला सिद्ध करून दिला आहे. मी खरेच बोलतो. वैचारिक विचार, मतभेद असायला हवे. आता व्यक्ती म्हणूनही त्यांना आपला विरोध आहे. जो माणूस घटनेच्या, कायद्याच्या पदावर बसलाय तो माणूस कायदा पायदळी तुडवायला लागला. जातीजातीत दंगली, मराठा-ओबीसीत वाद होतील अशी विधाने करू लागला. कायदा सांभाळण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही दंगली होतील अशी विधाने करतायेत हा कसला तुमचा वैचारिक वारसा? अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे पाटील हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यावेळी जरांगेंनी भुजबळांवर जोरदार प्रहार केले. जरांगे पाटील म्हणाले की, तुमच्या पोटातील गटारगंगा तुम्ही बाहेर काढली आणि स्वत:ची लायकी दाखवली. जातीजातीत दंगली भडकवण्याच्या भाषा तुम्ही केली. परंतु मराठे राज्यात जातीय दंगली होऊ देणार नाही असा विडाच आम्ही खांद्यावर उचलला आहे. मी संयम ठेवलाय, मी कुणाचं ऐकून घेत नाही. राजकीय स्वार्थासाठी मराठा-ओबीसीत दंगल घडवायची हा ह्यांचा हेतू. पण यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही हे मी ठरवले. त्यामुळे मी काहीच उत्तर देत नाही. गावखेड्यातील ओबीसी बांधवांची भावना आहे की, मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर त्यांना आरक्षण द्यायला हवे अशी त्यांना वाटते. आजही गावखेड्यात मराठा-ओबीसी बांधव एकमेकांच्या मदतीला धावून जातायेत असं त्यांनी म्हटलं.
तसेच मराठा समाजाला आरक्षण होतं, तरीही मराठ्यांना जाणुनबुजून दिले नाही. नुसतं बोंबलत बसायचं ही खानदानी मराठ्यांची संस्कृती नाही. किती दिवस मतभेद ठेवणार? मला अनेक फोन येतात, तुमच्या गाडीत हा नको, तो नको, त्याच्यापासून लांब जा, अरे बसू द्या. मी जास्त वळवळ करून देत नाही. माझी भूमिका समाजाला आरक्षण मिळवून द्यायची आहे. जातीसाठी एकी हवी. गोरगरिबांच्या लेकरांना आयुष्याची भाकरी द्यायची त्यासाठी ही लढाई आहे. आता काय व्हायचे ते होऊ द्या, सुट्टीच नाय...माझ्या ताफ्यात जेवढ्या गाड्या आहेत त्यांच्यात स्वत: डिझेल टाकायचे, मराठ्यांनी कुणाकडे पैसे मागायचे नाहीत. जर कुणी पैसे घेत असेल तर मला सांगा, त्याचा कार्यक्रमच करतो. इथे जातीसाठी न्याय मागतोय. अंतरवालीत शांततेत आंदोलन सुरू होते. काय झालं माहिती नाही. पण २५ व्यादिवशी आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला, आयाबहिणींची डोके फोडण्यात आले. पोरांच्या छातीत गोळ्या घातल्या असा आरोप जरांगे पाटलांनी केला.
दरम्यान, ४-५ दिवसांनी मला फोन यायला लागले, दादा आता रक्त सांडलंय, पण आता मागे हटायचे नाही. आरक्षण मिळवायचे. ते आंदोलन आजही शांततेत सुरू आहे. आमच्यावर का हल्ला केला याचे उत्तर आजही सरकारला देता आले नाही. ज्यांच्यावर हल्ला झाला, मारपण आम्ही खाल्ला, आमच्यावर ३०७, १२० ब सारखी कलमे लावली. जालनात कट नेमका कुणी रचला? लाठीचार्जचे आदेश कुणी दिले त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता.ओबीसीत एखादी जात घ्यायची असेल तर ती मागास असायला हवी. १९६७ ला व्यवसायावर आधारित जाती निर्माण केले आणि आरक्षण दिले. व्यवसायावर आधारित आरक्षण दिले मग मराठ्यांना का नाही? मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? मराठ्यांची पोरं मोठी होऊ द्यायची नाही हे षडयंत्र होते, मराठ्यांनी विश्वास ठेवला आणि गाफील राहिले असंही जरांगे पाटील बोलले.