“म्हातारा माणूस म्हणून काही बोलत नाही, मराठा आरक्षणाला विरोध केला तर खरे नाही”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 12:45 PM2023-11-20T12:45:14+5:302023-11-20T12:49:11+5:30
Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठ्याची आलेली त्सुनामी कोणीच रोखू शकत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले.
Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणारे मनोज जरांगे पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. कोकणानंतर मनोज जरांगे पुण्यात दाखल झाले. यानंतर मनोज जरांगे ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे येणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला असून, मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. मनोज जरांगे हेदेखील छगन भुजबळ यांना थेट प्रत्युत्तर देत आहेत. अशातच म्हातारा माणून आहे म्हणून काही बोलत नाही. परंतु, मराठा आरक्षणाला विरोध केला तर काही खरे नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला आहे.
ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केला. मराठ्यांच्या लेकरांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. इतरांना आरक्षण देताना मराठा समाजाने कधीही विरोध केला नव्हता. पण आता आम्ही आरक्षण मागितले तर का विरोध होत आहे, अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. हे आंदोलन सरकारशी समेट घालायला नाही, तर मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. म्हातारा माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही. पण मराठा आरक्षणाला विरोध केला तर मग मात्र काय खरे नाही, असा अप्रत्यक्ष इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिला.
आता व्यक्ती म्हणूनही विरोध आहे
छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच त्यांना विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठ्याची आलेली त्सुनामी कोणीच रोखू शकत नाही. मराठ्यांची मुले शेतातच राहिली. आरक्षण नसल्याने ही मुले त्यांची स्वप्न पूर्ण करू शकली नाहीत. आम्ही मराठे आरक्षणाच्या सगळी सवलती हे घेणार आहोत. माझाकडे एक मंत्री आले होते. मला म्हणाले तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही. मराठ्यांची पोटजात का होऊ शकत नाही, तर तो म्हणाला साहेबाना विचारून येतो, तो परत आलाच नाही, या शब्दांत मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, या सरकारला आरक्षण देण्यासंबंधी सद्बुद्धी द्यावी, असे साकडे तुकोबा चरणी घातले आहे. हे सरकार आम्हाला आरक्षण देईल. मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे. प्रत्येकामध्ये उत्साह आहे की आरक्षण मिळणार आहे, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.