जरांगेंचा थेट फडणवीसांना फोन! कोणत्या विषयावर झाली चर्चा? आरक्षणावर काय बोलणे झाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 06:05 PM2024-09-05T18:05:16+5:302024-09-05T18:07:27+5:30
Manoj Jarange Patil Make Phone Call to BJP DCM Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या कानावर सरसकट शब्द गेलेला आहे. तसे झाले नाही तर शेतकरी तुम्हाला पाडल्याशिवाय सोडत नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
Manoj Jarange Patil Make Phone Call to BJP DCM Devendra Fadnavis: पाडायचे की उभे करायचे, याचा निर्णय मराठा समाज घेणार आहे. मराठ्यांच्या नादी लागणे सोपे नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागू नये. केवळ पाडा म्हणालो होतो, तर एवढ्यांना पाडले. पण आता नावे घेणार. त्यावेळेस मग अवघड होईल. प्रत्येक मतदारसंघात मराठे आहेत, हे लक्षात ठेवा. मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
तत्पूर्वी मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले एक लाखाचे आणि तुम्ही देणार पाच हजार रुपये, नुकसान झाले १० लाखाचे आणि तुम्ही मदत दिली, १२-१३ हजारांची, कुणाचे २० हजार रुपयाचे नुकसान झाले आणि तुम्ही ७००-८०० रुपयांची मदत दिली, असे नको. जे नुकसान झाले, त्याची सगळी आणि सरसकट भरपाई दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे आणि शिंदेंच्या वतीने अब्दुल सत्तार होते, त्यांनाही सांगितले आहे. कृषी मंत्री असतील, त्यांना सांगितले आहे. त्यांनी शब्दच दिलाय की, सरसकट मदत करतो म्हणून, असे जरांगे यांनी सांगितले.
तुम्हाला शेतकरी पाडल्याशिवाय सोडत नाही
देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना आठ दिवसात मदत द्या, असं मी त्यांना बोललो. तुम्ही मदत देत असताना म्हणत असाल, आठ दिवसांनी देतो, दहा दिवसांनी देतो आणि देताना दोन वर्षांनी देतात. तर तुम्हाला शेतकरी पाडल्याशिवाय सोडत नाही. शेतकऱ्यांच्या कानावर सरसकट शब्द गेलेला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोण किती लबाड बोलते हे कळेल. शेतकऱ्यांची कोणीही फसवणूक करू शकत नाही. त्यांनी शेतकऱ्यांना फसवले, हे समजायचे की शेतकरी त्यांना फसवणार आहेत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, २२ ते २३ मतदारसंघ सोडले तर लाखोंच्या घरात सर्व ठिकाणी मराठा समाज आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही पुढच्या काळात मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या कामाला लागा. मराठ्यांच्या विरोधात जायचे काम करू नका. कारण आता मराठे निर्णय घेणार आहेत. एकदा निर्णय झाला की, लोकसभेला कचका दाखवला आहे, याची आठवण जरांगे यांनी करून दिली.