मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 11:03 AM2024-10-20T11:03:42+5:302024-10-20T11:04:27+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Manoj Jarange Patil News: मुस्लीम धर्मगुरूंनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. आवश्यक वाटले म्हणून मार्गदर्शन घेतले. यामुळे आता विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

manoj jarange patil meets muslim leader sajjad nomani and discussion on maharashtra assembly election 2024 | मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण

मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 Manoj Jarange Patil News:  एकाबाजूला महायुती आणि महाविकास आघाडीसह परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी तसेच अन्य पक्षांमध्ये जागावाटप, उमेदवारी याद्या यांवर भर दिला जात असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला इशारा दिला असताना मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लीम धर्मगुरूंची भेट घेतल्याचे समजते.

मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन रात्री उशिरा मुस्लिम धर्मगुरू तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची  भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल दोन तास झाली चर्चा झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनोज जरांगे पाटील निवडणुकीबाबत भूमिका जाहीर करणार आहेत. थेट निवडणुकीत सहभागी व्हायचे की पाडायचे? याचा निर्णय होणार आहे. तत्पूर्वी, मनोज जरांगे यांनी मुस्लीम धर्मगुरूशी केलेल्या चर्चेला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले असून, राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे.

मुस्लीम धर्मगुरूंनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे

वेगवेगळ्या चर्चा होणारच. राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाली. सज्जाद नोमानी हे ज्येष्ठ व्यक्ती आहेत. त्यांच्या समजात त्यांचे एक वेगळे वजन आहे. अशा माणसाला भेटायला गेल्यानंतर त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत. त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यांना दोन-तीन दिवसांचा वेळ हवा आहे. दोन-तीन दिवसांत ते काय निर्णय घेणार हे लक्षात येईल. त्यांचे राज्यभरातील धर्मगुरू आहेत. त्यांच्याशी चर्चा करून ते कळवतील. एक वेगळे समीकरण उभे राहिले पाहिजे. त्यानंतरच सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे. 

विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते

गोरगरीबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र यावे लागणार आहे. शेवटी शेतकरी अडचणीत सापडला आहे. सामान्य जनता अडचणीत सापडले आहे. तेव्हा चर्चा केली पाहिजे, जे वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत, अनेक वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. नोमानी हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक वाटले म्हणून त्यांचे मार्गदर्शन घेतले. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेला समाज जिथे मानवतावाद असतो, तिथे जात लावून चालत नाही. मानवतावाद जागा ठेवणे महत्त्वाचा आहे. नोमानी साहेब मोठे विचारवंत आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचे प्रचंड मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

माणुसकीच्या नात्याने भेट घेतली आहे

त्यांची इच्छा होती. पण त्यांना अंतरवाली सराटीत येता आले नाही. त्यामुळे मी इथपर्यंत आलो. माणुसकीच्या नात्याने भेट घेतली आहे. त्यांना अन्यायाची चीड आहे. समाजाचा आणि गोरगरिबांचा मान सन्मान वाढवणे गरजेचे आहे. दोघांमधील चर्चा सकारात्मक होती. धर्मपरिवर्तन, सत्तापरिवर्तनासाठी आपण एकत्र आलेलो नाहीत, ही गोष्ट त्यांना मान्य आहे. गोरगरीब, दलित, शेतकऱ्यांना, गोरगरीब मुस्लिमांना न्याय द्यायचा असेल तर, एकत्र यायला हवे. आपले भविष्य आजमावण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, हाच प्रयत्न आम्ही करत आहोत, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

राजकीय तज्ज्ञ, अभ्यासक आणि वकिलांसोबत एक बैठक

मनोज जरांगे यांनी अनेक राजकीय तज्ज्ञ, अभ्यासक आणि वकिलांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत आताचे राजकारण तसेच भविष्यातील भूमिका यावर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील लोकसभेप्रमाणे विधानसभेला पाडापाडीच्या राजकाणाची भूमिका घेऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुकीत उभे राहूनच विजय मिळावावा, असे काही नाही. पाडण्यातसुद्धा विजय आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही मनोज जरांगे ऐरणीवर आणत आहेत. मराठा फॅक्टरला दलित आणि मुस्लीम समाजाची साथ मिळाल्याचे लोकसभेत दिसून आले. विधानसभेत जरांगे पाटील उभे ठाकले अथवा त्यांनी काही उमेदवारांना पाठिंबा दिला. तर त्यांच्या मागे हे तीनही समाज एकगठ्ठा उभा राहिला, तर राज्यातील चित्र बदलू शकते, असा कयास बांधला जात आहे.
 

Web Title: manoj jarange patil meets muslim leader sajjad nomani and discussion on maharashtra assembly election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.