पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 08:00 PM2024-07-01T20:00:09+5:302024-07-01T20:02:57+5:30
Manoj Jarange Patil News: आम्ही एकजूट आहोत आणि एकजुटीने राहणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अलीकडील लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याबाबत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे हे विजयी झाले. ज्या दिवशी निकाल लागला, त्याच दिवशी मध्यरात्री बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. तसेच मनोज जरांगे फॅक्टरमुळे विजय मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी दिली आहे. यासंदर्भात मनोज जरांगे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
वाईट म्हणायचे काम नाही आणि चांगले म्हणायचे काम नाही. दुःख व्हायचे कारण नाही. त्यांनी आणि त्यांच्या समाजाने काय समजून घ्यायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही जातीवादी नाही. आम्ही कधी त्यांना पाडा, असे म्हटले नाही. त्याचा परिणाम आमच्या समाजावर होण्याचे काही कारण नाही. आम्ही एकजूट आहोत आणि एकजुटीने राहणार. मराठा आरक्षण आम्ही मिळवणारच, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या गोष्टीचे स्वागत केल्याने आणि न केल्याने त्यांना काही फरक पडणार आहे का, फरक पडणार असेल, तर कौतुक करू. पंकजा मुंडेंना आमचा विरोध असण्याचा कारणच नाही. आम्ही यापूर्वीही कधी विरोध केला नाही. मात्र त्यांनीच आम्हाला विरोधक मानले. त्याला आम्ही काही करू शकत नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.