मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 02:31 PM2024-01-01T14:31:32+5:302024-01-01T14:33:20+5:30

Manoj Jarange Patil News: राम मंदिराचे काम अर्धवट झाले आहे, तरी तुम्ही तीच तारीख का निवडली, अशी शंका आम्ही कधी उपस्थित केली नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

manoj jarange patil reaction on ayodhya ram mandir and gave 2024 new year wishes | मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार”

मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार”

Manoj Jarange Patil News ( Marathi News ): आम्ही कट्टर हिंदू आहोत. अमूकच तारीख का निवडली, याचा आणि राम मंदिर लोकार्पणाचा काही संबंध नाही. मुंबईत मुद्दामहून १८ तारखेपर्यंत जमावबंदी लागू केली. त्यामुळे आम्ही २० तारीख निवडली. अयोध्येत राम मंदिर होत आहे, याचा आम्हालाही तितकाच आनंद आहे. आम्ही मुंबईत आनंद व्यक्त करू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे लोकार्पण केले जाणार आहे. मात्र, नेमकी हीच वेळ मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्यासाठी निवडली, असा आरोप केला जात आहे. यावर मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. 

मीडियाशी बोलताना, छत्रपती शिवरायांच्या काळात जास्त महत्व ध्येय आणि विचारांना दिले जात होते. त्याचप्रमाणे आमचे ध्येय आणि सूत्र ठरले आहे. गोरगरीब मराठ्यांच्या ध्येयांसाठी आम्ही काम करतो आहे, असे सांगत मनोज जरांगे यांनी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, देव मनात असायला हवा. सगळे तिथे पोहोचू शकत नाही. सामान्य शेतकरी शेतातून राम-राम म्हणतो. एकमेकांना भेटल्यावर राम-राम म्हणतो. राम मंदिराचे काम अर्धवट झाले आहे, तरी तुम्ही तीच तारीख का निवडली, अशी शंका आम्ही कधी उपस्थित केली नाही. श्रीरामावर तुमच्यापेक्षा आमची जास्त आस्था आहे. २० तारखेला सगळा मराठा पायी चालण्यास सुरुवात करेल, तेव्हा २२ तारखेला सगळेच जण राम मंदिराच्या लोकार्पणाचा आनंद व्यक्त करणार आहेत. आम्हीही त्या आनंदात सहभागी आहोत. गेल्या चार महिन्यांपासून आमचे आंदोलन सुरू आहे. विविध टप्प्यांवर आंदोलन सुरू आहे. सरकारशी चर्चा सुरू आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

सरकार मुद्दामहून असे पसरवतेय, असा समज होईल

प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन मराठे मुंबईकडे निघणार आहेत. आम्ही इकडे आनंद व्यक्त करतो. हे सगळ्यांना मान्य आहे. असे काही जोडू नका. अन्यथा सरकार मुद्दामहून असे पसरवतेय, असा समज समाजात होईल आणि सरकारविषयी नाराजी वाढेल, असे नमूद करत, सरकारने कोणाचीही वाहने अडवू नयेत.आंतरवालीचे प्रयोग करण्याचा पुन्हा प्रयत्न करू नये. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मुंबईकडे मराठे शांतपणे येणार आहेत आणि शांतपणे परत जाणार आहेत. एखादे वाहन जरी अडवले तरी तिघांच्या दारात जाऊन लाखो मराठे बसतील. मुंबईसह नागपूर, बारामती या ठिकाणी जाऊन तिघांच्या दारात बसू. घराला वेढा दिला जाईल, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

मनोज जरांगे पाटील अयोध्येत जाऊन श्रीरामांचे दर्शन घेणार का?

अयोध्येत जाण्याबाबत मनोज जरांगे यांना प्रयत्न विचारण्यात आला. यावर सकारात्मक उत्तर देत, श्रीरामांनी सरकारला सुबुद्धी द्यावी. श्रीरामांच्या चरणी आमची विनंती आहे, साकडे आहे की, केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्वांना सद्बुद्धी द्यावी. २० तारखेच्या आत आम्हाला आरक्षण द्या. मग मराठे मोकळे झाले, तिकडे यायला. मग काही अडचण नाही. मनोज जरांगेसह सगळे मराठे अयोध्येत दर्शनासाठी जातील. पण काही झाले तरी आरक्षण सोडणार नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

दरम्यान, आम्ही ठरवले आहे आता महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार. आमचा जीव गेला तरीही मुंबईचे आंदोलन होणारच. लाठीचार्जमध्ये हात-पाय मोडले गेले. मी ते काहीही विसरलो नाही. आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जची आठवण आली की आजही माझ्या अंगावर काटा येतो. त्या किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरले होते. मोठा आवाज, रक्ताने माखलेली जागा, धूर, लाठीचार्ज, माता माऊलींच्या किंकाळ्या, अमानुष लाठीचार्ज ही घटना आठवली की सरकारचे तोंडही पाहू नये असे वाटते. पण आता गाव त्याच ताकदीने पेटून उठले आहे. जे रक्त सांडले त्याचे बळ निर्माण झाले आहे. तो विषय काढण्यासारखा नाही. ज्या मातामाऊलींचे रक्त सांडले आहे ते वाया जाऊ देणार नाही. या समाजासाठी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

 

Web Title: manoj jarange patil reaction on ayodhya ram mandir and gave 2024 new year wishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.