“आधी आरक्षण, मग जनगणना”; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 07:57 PM2023-10-03T19:57:17+5:302023-10-03T19:58:33+5:30
Manoj Jarange On Caste Based Census: तुम्ही आता गप्प बसा. आधी आम्हाला आरक्षण द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange On Caste Based Census: बिहारच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. यानंतर आता विविध राज्यांतून जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे, याबाबतची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, असे ठाम मत व्यक्त केले आहे. मात्र, मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जनगणनेबाबत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
राज्यात कोणता समाज किती टक्के आहे? याबद्दलची माहिती मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कोणत्या जातीचे किती लोक आहेत, हे एकदा लोकांना कळू द्यावे. त्याचे चित्र पुढे ठेवल्यानंतर जो सगळ्यात दुबळा आहे. त्याच्यासाठी देशाची, राज्याची शक्ती वापरण्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे, असे शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या राज्यातील जातीनिहाय जनगणनेच्या मागणीबाबत मनोज जरांगे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावेळी मनोज जरांगे यांनी वेगळी भूमिका मांडली.
तुम्ही आता गप्प बसा, आधी आम्हाला आरक्षण द्या
तुम्ही जातीनिहाय जनगणना करा, नाहीतर पुरावे जमा करा. तुम्हाला जे काय करायचे ते करा. आता मी एकदाच सगळ्या पक्षांना सांगितले आहे की, तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात जाऊ नका. तुम्ही आता गप्प बसा. आधी आम्हाला आरक्षण द्या, मग जनगणना करा. त्यानंतर ५० टक्क्यांची मर्यादा वाढवा, नाहीतर अन्य काही करा. आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. आधी मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षण द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अवधी दिली आहे. ४० दिवसांत मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, तर पुन्हा उपोषणाला बसू असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.