“अटक करायची तर करु द्या, तुरुंगात जायला घाबरत नाही, पण त्यानंतर...”: मनोज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 04:00 PM2023-12-02T16:00:16+5:302023-12-02T16:00:39+5:30
Manoj Jarange Patil: बीडमध्ये घडले ते सत्य आहे. त्याचे कधीही समर्थन केले नाही. पण निष्पाप लोकांना तुरुंगात टाकले, असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीवर आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील ठाम असून, अनेक ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. याशिवाय शिंदे समिती रद्द करण्याची मागणीही छगन भुजबळ यांनी केली आहे. अटकेच्या चर्चांवर मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
अटक करायची तर करु द्या, तुरुंगात जायला घाबरत नाही, पण...
मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, असे आश्वासन देण्यात आले होते. पण गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे माझ्या अटकेची शक्यताही असू शकते. पण मला अटक करणे सरकारला तेवढे सोपे जाणार नाही. मला अटक करायची असेल तर करू द्या. मी तुरुंगात जायला घाबरत नाही. मला अटक झाल्यावर मराठा समाज काय आहे? हे सरकारला कळेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे, की आंदोलकांची अटक थांबवा. बीडमध्ये जे घडले ते सत्य आहे. त्याचे आम्ही कधीही समर्थन केले नाही. पण तुम्ही निष्पाप लोकांना तुरुंगात टाकले. तीन-चार हजार लोकांच्या याद्या केल्या आहेत. लोकांनी पोलिसांवर रोष व्यक्त करता कामा नये. पोलीस हा आपला मित्र आहे. पोलीस आपल्याला आधार देणारा आहे. जातीय द्वेष करणार नाही, अशी भावना पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले.