“सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 03:23 PM2023-10-19T15:23:46+5:302023-10-19T15:24:37+5:30

Maratha Reservation Manoj Jarange Patil: या आत्महत्येला फक्त सरकार जबाबदार आहे. २४ तारखेनंतर होणारे आंदोलन सरकारला परवडणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

manoj jarange patil reaction over jalna youth end life in mumbai for maratha reservation | “सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका

“सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका

Maratha Reservation Manoj Jarange Patil:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यात अनेकांचे बळीही गेले आहेत. त्यामुळे सरकारने आता तरी जागे व्हावे अशी मागणी मराठा समाज करत आहे. यातच मराठा आरक्षणप्रश्नी नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. 

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली, अशी माहिती मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ट्विट करून दिली. या आत्महत्या प्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. सरकारने बळी घ्यायचे का ठरवले आहे हे कळत नाही. सरकारमुळे बळी पडायला लागले आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. 

आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? 

भावांनो आरक्षण मिळणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. खूप वर्ष दम धरला आहे. थोडे दिवस आणखी दम धरा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो पोरं जायला लागले, आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? तुम्ही दम धरा. पण हे सगळे पाप सरकारचे आहे. सरकारला किती मुडदे पाडायचे आहेत माहिती नाही. एक माणूस कमी झाला. याला पूर्ण जबाबदार सरकार आहे. आता तरी त्याचे बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने आता तातडीने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. २४ तारखेनंतर होणारे आंदोलन सरकारला परवडणार नाही, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

दरम्यान, या आत्महत्येला फक्त सरकार जबाबदार आहे. आमच्या हक्काचा असणारा विषय ताबडतोब मिटवला तर ही वेळ येणारच नाही. मराठा समाजाचा अंत सरकारने पाहू नये. २४ तारखेनंतर होणारे शांततेचे आंदोलन सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. असे काही ऐकल्यानंतर खूप वेदना होतात. या वेदना थोडे दिवस सहन करा. पाया पडून सांगतो कोणी आत्महत्या करू नका. आमच्या परिवारातील आमचा भाऊ गेला आहे. आमचा माणूस गेला आहे तो परत येणार नाही. सरकारने तातडीने आरक्षण द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: manoj jarange patil reaction over jalna youth end life in mumbai for maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.