“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:39 AM2024-04-30T11:39:59+5:302024-04-30T11:41:36+5:30
Manoj Jarange Patil: उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय आहे. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे समाज योग्यरित्या ठरवेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हा शिवाय दुसऱ्या कोणत्याही चिन्हाचा प्रचार कधीही केला नव्हता. परंतु महाराष्ट्रातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. ८८ जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदान एका टप्प्यात आहे. मात्र महाराष्ट्रात ४८ जागा असताना पाच टप्प्यात मतदान घेऊन ठिकठिकाणी स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांना सभा घ्याव्या लागत आहेत. हा सत्ताधाऱ्यांचा पराभव असून मराठा एकजुटीचा विजय आहे, अशी टीका मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मीडियाशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला कुणाला पाडा किंवा कुणाला विजयी करा, असे सांगितले नाही. ज्याला पाडायचे त्याला असे पाडा की त्याला मराठा समाजाची ताकद दिसली पाहिजे असे म्हटल आहे. मराठा समाजाने पाडायचे शिकले पाहिजे, असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीनंतर सगेसोयरे कायदेशीर अंमलबजावणी न केल्यास यापेक्षाही बिकट परिस्थितीचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागेल. मराठा समाजाने एक महिन्यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर आली आहे
आव्हान तर त्यांच्यापुढे उभे राहिले आहे. उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय आहे. स्वतःची मुले आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेऊन मराठा समाजाने यावेळेस ताकदीने काम करायचे आहे. एक गोष्ट खरी आहे, मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा घेण्याची कधी गरज पडली नाही. मी म्हटले होते की, मराठ्यांना खेटू नका. तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करत आहेत. माझ्या गोरगरीब मराठा लेकरांवर गुन्हे दखल केले. काहीही नसताना गुन्हे दखल करण्यात आले. आरक्षण असून दिल नाही. ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर आली आहे, या शब्दांत मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. कोण येत आणि कोण जाते हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही. पाहिल्यासारखे मराठे आता राहिले नाही. आता फायदा घेऊ देत नाहीत. मी घेऊ देत नाही तर मराठे कसे घेऊ देतील. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे समाज योग्यरित्या ठरवेल, असे मनोज जरांगे म्हणाले.