मविआ, महायुतीच्या नाराजांना उमेदवारी देणार का? मनोज जरांगेंचे सूचक विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 04:26 PM2024-09-02T16:26:10+5:302024-09-02T16:28:05+5:30
Manoj Jarange Patil News: लोकसभेला समाजाने ताकद दाखवून दिली आहे, विधानसभेतही दाखवू, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यातच अनेक विषयांवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच महायुतीत अंतर्गत कलह असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.
मीडियाशी बोलताना मनोज जरांगे यांनी काही मुद्द्यांवर थेट शब्दांत भाष्य केले. लाडकी बहीण योजना आणली, ही चांगलीच. पण आरक्षणाचे काय? हे फक्त नादी लावतात. हे सगळे आमच्या करातून सुरू आहे. कर्तव्यदक्ष सरकार आमचेच पैसे आम्हाला देत आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, याची सखोल चौकशी व्हावी. याचे राजकारण करू नका. आरडाओरडा करून आरक्षणाचा विषय मागे पाडण्याचा डाव करत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
मविआ, महायुतीच्या नाराजांना उमेदवारी देणार का?
महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नाराजांना उमेदवारी देणार का, अशा आशयाचा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. यावर, महायुती आणि मविआमधील नाराजांना आम्ही आमच्या सोबत घेणार नाही. त्यांना सोबत घेऊन आमच्यातल्या इच्छुकांचे आम्ही काय करू? असा प्रतिप्रश्न करत विधानसभा निवडणुकीत लढायचे असेल तर उमेदवारांची नावे समाजासमोर ठेवणार आहे. मग समाजाने ठरवावे. आमची एकजूट असल्याने कोणी कोणाचे पाय खेचणार नाही, अशी आशा जरांगे यांनी व्यक्त केली. मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. माझी ती इच्छा नाही. तसे असते तर जाहीर केले असते. इतरांना म्हटले असते तुम्ही आमदार व्हा. मला माझा स्वार्थ पाहायचा नाही, समाजासाठी लढायचे आहे. सरकारला आमची विधानसभेची भूमिका पहायची होती, पण त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या. मग आम्हीपण आमचा निर्णय पुढे ढकलला आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, विधानसभेला कोण टार्गेट असेल हे आताच सांगणार नाही. लोकसभेला समाजाने ताकद दाखवून दिली आहे, विधानसभेतही दाखवू. देवेंद्र फडणवीस कोणत्याच मंत्र्याला अन् आमदारांना काम करू देत नाहीत. अगदी आरक्षणाबाबतही बोलू देत नाहीत. आमच्या समाजाला राजकारणात जायचे नाही. पण आरक्षण दिले नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणारच, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.