"मनात असलं तर काहीही...."; शरद पवार-मराठा समन्वयकांच्या बैठकीवर मनोज जरांगे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 10:52 AM2024-07-27T10:52:19+5:302024-07-27T10:54:26+5:30

मराठा आरक्षणावरून राज्य सरकार आणि विरोधक या दोघांवर मनोज जरांगे पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

Manoj Jarange Patil reaction to the meeting of Maratha coordinator and Sharad Pawar, also targeted the government over Maratha Reservation | "मनात असलं तर काहीही...."; शरद पवार-मराठा समन्वयकांच्या बैठकीवर मनोज जरांगे थेट बोलले

"मनात असलं तर काहीही...."; शरद पवार-मराठा समन्वयकांच्या बैठकीवर मनोज जरांगे थेट बोलले

छत्रपती संभाजीनगर - मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मविआ-महायुतीनं एकत्रित निर्णय घेतला पाहिजे. फक्त घुमवा घुमवी नको. आरक्षण द्यायचं असेल तर काही लागत नाही. मनात असल्यावर काहीही करता येते. उगाच काही तरी सांगायचे आणि दिशाभूल करावी यात काही अर्थ नाही. एकमेकांत गैरसमज पसरवण्याचं काम आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे ठरवायचंय असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समन्वयक आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य केले. छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मराठा आरक्षणावर सरकारने पुढाकार घेऊन लाईव्ह चर्चा घडवून आणणं गरजेचे आहे. या चर्चेसाठी सत्ताधारी, विरोधकांसोबत जरांगे, लक्ष्मण हाके यांच्यासह मराठा, ओबीसी नेत्यांना बोलावावं, या चर्चेतून जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असं शरद पवारांनी म्हटलं होतं, त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लाईव्ह नव्हे तर डोंगरावर जाऊन एकमेकांशी ओरडाओरड करून चर्चा करावी पण आम्हाला आरक्षण पाहिजे. इतकं येड्यात काढायचं नाही. कोलवाकोलवी करायची नाही. आरक्षणासाठी भेटीगाठी होत नाहीत असा टोला जरांगेंनी लगावला. 

तसेच मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे. आपल्याला मुर्ख कोण बनवतंय हे सहज लोकांना कळते. आधी अशिक्षितपणा होता, मात्र आता लगेच कोण कसं वागतंय हे कळतं. गोरगरिबांना न्याय द्यायचा असेल तर एकत्र यायला हवं. जातीला न्याय दिला पाहिजे. तुम्हाला जे काही करायचे करा आम्हाला आरक्षण हवं. ७०-७५ वर्षापासून सगळेच गोरगरिब मराठ्यांना वेड्यात काढतायेत. लोकांच्या मनात खूप खदखद आहे. सगळ्या जातीजमातीत खदखद आहे असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितले.

दरम्यान, आम्ही कधीही महाविकास आघाडी, महायुती यांना विरोधक मानलं नाही. मराठ्यांची त्सुनामी उसळली आहे त्या लाटेत सर्व वाहून जाणार आहेत. माझा मराठा एक झालेला राजकीय लोकांना पचत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा एकत्र आल्याचं त्यांनी कधी पाहिलेले नाही. सत्ताधारी-विरोधक हे केवळ गैरसमज पसरवतायेत. आपल्याला कुणी मॅनेज होत नसेल तर त्याला फसवायचे. माझ्या समाजाने तुमच्या नेत्यांच्या हमाल्या करायच्या का?,  विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे हे समाजासाठी नाटक आहे. समाजात गोंधळ निर्माण करुन गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र आहे. समाजाला वेड्यात काढण्यासाठी हा चालुपणा आहे असा आरोपही मनोज जरांगे पाटलांनी केला.

Web Title: Manoj Jarange Patil reaction to the meeting of Maratha coordinator and Sharad Pawar, also targeted the government over Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.