“माझा बोलविता धनी कोण आहे, ते २४ डिसेंबरनंतर कळेल”; मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 07:27 PM2023-12-11T19:27:00+5:302023-12-11T19:28:55+5:30
Manoj Jarange Patil: आता भाजप नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण घेण्यावर आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील ठाम असून, ओबीसी समाजातून याला तीव्र विरोध होताना दिसत आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ ठिकठिकाणी एल्गार सभा घेत असून, मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे हेदेखील छगन भुजबळ यांना प्रत्यत्तर देत आहेत. यानंतर आता मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. याला भाजप नेत्यांनी उत्तर दिले. राजकीय भाष्य करून नका. देवेंद्र फडणवीसांविरोधात तर बिलकूल भाष्य करू नका. लेकरू लेकरू म्हणत तुम्ही आता राजकीय ‘ढेकरू’ द्यायला लागला आहात. मला वाटते की हे योग्य नाही. ज्या माणसाने २०१८ मध्ये मराठ्यांना आरक्षण दिले, ते आरक्षण कुणामुळे गेले? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तसेच आपला राजकीय बोलविता धनी कोण आहे? हेही आम्हाला माहिती आहे, असे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले होते. याला मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहे.
माझा बोलविता धनी कोण आहे, ते २४ डिसेंबरनंतर कळेल
प्रसाद लाड यांच्या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की, मला कोणावरही बोलायचं नाही. २४ डिसेंबरपर्यंत थांबा, आमचा बोलविता धनी कोण आहे? हे तुम्हाला कळेल. थोडा दम धरा, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे. यानंतर आता भाजप नेते आणि मनोज जरांगे यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस तुमच्या मनात काही विषारी विचार असेल तर मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये कलह लावू नका, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.