“छत्रपती शिवराय संपूर्ण देशाचे दैवत, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 05:02 PM2024-08-28T17:02:49+5:302024-08-28T17:03:40+5:30

Manoj Jarange Patil News: केसरकरांच्या बोलण्यातील शुभ संकेतचा अर्थ म्हणजे भाजपाचे सरकार जाते, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.

manoj jarange patil replied deepak kesarkar over shivaji maharaj statue collapsed statement and warn mahayuti govt | “छत्रपती शिवराय संपूर्ण देशाचे दैवत, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील”: मनोज जरांगे

“छत्रपती शिवराय संपूर्ण देशाचे दैवत, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: मालवण सिंधुदुर्गातील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते मालवण येथे पाहणी करायला गेले होते. तेव्हा तिथे नारायण राणेही आले. यामुळे ठाकरे गट आणि राणे समर्थक यांमध्ये जोरदार राडा झाला. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनीही सरकारला थेट इशारा दिला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हा एक अपघात आहे. त्यामुळे नागरिकांनी या पद्धतीने याकडे बघावे, कदाचित वाईटातून काहीतरी चांगले घडायचे असेल आणि त्यामुळे हा अपघात घडला असेल, असे विधान महायुती सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी केले. यावरून विरोधकांनी केसरकर आणि सरकारवर निशाणा साधला. दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानाचा मनोज जरांगे पाटील यांनीही खरपूस शब्दांत समाचार घेत खोचक टोला लगावला.

भाजपाचे सरकार जाते, असा त्यांचा रोख असावा

दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, ते तर खूप हुशार आहेत. त्यांना काय बोलावे हे कळत नसावे, एका मंत्र्यांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे बोलणं म्हणजे अवघड आहे. केसरकर यांच्या बोलण्यातील शुभ संकेतचा अर्थ म्हणजे भाजपचे सरकार जाते, असा त्यांचा रोख असावा, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी दीपक केसरकर यांना लगावला.

दोषी असणार्‍याला कायमचे जेलमध्ये टाका

छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला, याची सखोल चौकशी करून दोषी असणार्‍याला कायमचे जेलमध्ये टाका. कायद्याची जरब एवढी बसली पाहिजे की, कुठल्याही महापुरुषाचा अपमान करण्यापूर्वी त्याने दहा वेळा विचार केला पहिजे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणे हे फार वेदनादायक आहे. त्यामुळे राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून तातडीने याची चौकशी करा, अन्यथा याचे सखोल परीणाम सरकारला भोगावे लागतील, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
 

Web Title: manoj jarange patil replied deepak kesarkar over shivaji maharaj statue collapsed statement and warn mahayuti govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.