छगन भुजबळांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “मी खानदानी मराठा, आरोप केला तर...”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 08:40 PM2023-10-03T20:40:57+5:302023-10-03T20:41:38+5:30
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाच्या बाजुने उभे राहा. मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असे आवाहन मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना केले आहे.
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अवधी दिली आहे. ४० दिवसांत मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, तर पुन्हा उपोषणाला बसू असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देणार नाही किंवा देता कामा नये, अशी भूमिका सर्वांचीच आहे. मला एकट्यालाच का बोलताय, माझ्या एकट्याच्या हातात आहे काय? ही सगळी मंडळी जी आहे, ती त्याच मताची आहे, हेच मला त्या जरांगेंना सांगायचे आहे. मग, यांची नावे घेऊन का बोलत नाही, असा सवाल छगन भुजबळ यांनी पलटवार करताना केला. यावर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले.
मराठ्यांना आरक्षणात घेऊ नका म्हणाले म्हणून टीका केली
मी स्वत: आधी टीका करत नाही. मी उगीच कुणावर कधी आरोप करत नाही. समोरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केला तर मी त्याला सोडतच नाही. माझ्या वक्तव्याला राजकारणाचा वास येत असेल, तर सिद्ध करा. परत ते म्हणतात टीका करतो. पण मी कधी टीका करतो? तर ते बोलल्यावर. मी राजकारणासाठी राजकारण करणारा पोरगा नाही. मी खानदानी मराठा आहे. मी उगीच कुणावर कधी आरोप करत नाही. पण समोरच्याने आरोप केला तर त्याला सोडतच नाही. छगन भुजबळ म्हणाले, मराठ्यांना आरक्षणात घेऊ नका, म्हणून मी टीका केली, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.
दरम्यान, मी छगन भुजबळांना विनंती करतो. तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करू नका. उलट तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजुने उभे राहा. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.