“सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्यास पाठिंबा द्या, मराठ्यांचा रोष निवडणुकीत दिसेल”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 10:53 AM2024-04-08T10:53:24+5:302024-04-08T10:55:13+5:30
Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे सांगितले होते. परंतु दिले नाही. शासनाने धोका दिला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil News: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत काही जागांवरून तिढा असल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभारलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील राज्यातील विविध ठिकाणी दौरा करत आहेत. सगेसोयरे यांचा निर्णय घेईल, त्यांना पाठिंबा द्या. त्याच्या बाजूने उभे राहा. मराठा समाजात १०० टक्के रोष आहे आणि तो निवडणुकीत दिसेल, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला.
नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावरून मनोज जरांगे यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, जाऊ द्या त्यांचा नका विचार करू. ते उभे राहुद्यात मग बघतो, असे म्हटले आहे. तसेच मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी, पाठिंबा दिलेला नाही. कोणीही समाजाचे, माझे नाव वापरू नये. उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे व्हा, त्यात मोठा विजय आहे. मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष असून, तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या मनात खदखद आहे
मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे सांगितले होते. परंतु दिले नाही. शासनाने धोका दिला आहे. त्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री जबाबदार आहेत. सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढून अंमलबजावणी केली नाही. ५७ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. समाजाच्या मनात खदखद आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
दरम्यान, आमचा मार्ग हा राजकीय नाही. आम्हाला आरक्षण महत्त्वाचे आहे. आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. मराठा समाज हुशार आहे. समाजच ही निवडणूक हातात घेऊन ज्या पाडायचे आहे त्याला पाडेल, असे मनोज जरांगे म्हणाले.