“आरक्षण मिळेल तेव्हाच आमच्यासाठी खरे नववर्ष, २५ जानेवारीला...”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:37 IST2025-01-02T10:34:25+5:302025-01-02T10:37:33+5:30
Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर टीका केली आहे.

“आरक्षण मिळेल तेव्हाच आमच्यासाठी खरे नववर्ष, २५ जानेवारीला...”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
Manoj Jarange Patil News: राज्यात एकीकडे बीड आणि परभणीतील प्रकरणांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. बीड प्रकरणासंदर्भात करण्यात आलेल्या आंदोलनातही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तसेच सरकारवर निशाणा साधत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबारायाचे मनोज जरांगे पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी पूजा करून मनोज जरांगे पाटील यांनी गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होत आहे. त्यांना आरक्षण मिळू दे, शेतकरी अडचणीत आहे त्यांना बळ मिळू दे, सरकारने शेतकर्यांना मदत करावी, असा आशीर्वाद आपण खंडोबाकडे मागितल्याचे सांगितले. नवीन वर्ष आम्हाला आहे की नाही असे वाटत आहे. सुख आमच्या वाट्याला नाही. आरक्षण नसल्यामुळे गरिबांच्या लेकराच्या आयुष्याचे नुकसान होत आहे. नवीन वर्ष येतात जातात, पण आम्हाला न्याय कधी मिळेल याची अपेक्षा आहे. खरे नवीन वर्ष ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्या दिवशी असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
शेवटची टक्कर द्यायची, अंतिम लढाई करून आरक्षण मिळवायचे आहे
राज्यात बहुमताच सरकार आहे. तेव्हादेखील हेच होते ना. नुसते खांदे बदलले. पूर्वीही तेच होते आत्ता ही तेच आहेत . मराठ्यापुढे सरकार काही करत नाही. आमचे आंदोलन सरकार गांभीर्याने घेईल का नाही, हे आम्ही बघू आता. आतापर्यंत ढकलाढकली होती . आता मुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यांना २५ तारखेपर्यंत काही बोलणार पण नाही, नंतर सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, मी कोणाला अडसर नाही. एकनाथ शिंदे यांना विचारा की, मी अडसर आहे का ते. आता लक्षात येईल. कारण आता तेच मुख्यमंत्री आहेत. २५ तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढतेत की नाही, ते स्पष्ट होईल. आमरण उपोषण २५ जानेवारीला फायनल आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गृहमंत्रालयावर समाधानी असण्याचे कारण नाही . मस्साजोग आणि परभणीत जीव गेला. मस्साजोग प्रकरणात आणखी आरोपी फरार आहेत. धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा का त्याबद्दल मला माहिती नाही . मला एवढेच माहिती आहे , या प्रकरणात जे येतील, मग मंत्री असो , आमदार असो की राष्ट्रपती असो, सुट्टी द्यायची नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले.