“७५ वर्षांत आरक्षणासाठी कोणी काय-काय केले, ते समाजासमोर मांडणार”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 09:33 AM2023-11-15T09:33:34+5:302023-11-15T09:35:15+5:30
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर आता मनोज जरांगे राज्यातील काही ठिकाणी दौऱ्यावर जात आहेत. १५ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यातच गेल्या ७५ वर्षांत आरक्षणासाठी कोणी काय काय केले, याचा लेखाजोखा समाजासमोर मांडणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडून काढला आहे. सर्वच जिल्ह्यात नोंदी सापडत आहेत. त्यामुळे ४० टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. मराठा आरक्षणासाठी मागील ७५ वर्षांत कोणी काय केले हे २४ डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे.
मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा
१५ नोव्हेंबरपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. कोणी काय केले हे आम्ही काढून ठेवत आहोत. सध्या आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्यावे, हीच भूमिका आमची राहणार आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सभेत सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर मागील काही दिवसात जरांगे यांच्याकडून ओबीसी नेत्यांवर देखील टीका केली जात आहे. विशेष करून मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जरांगेंच्या निशाण्यावर आहे.
दरम्यान, भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथे जे घडले ते चुकीचे आहे. तेथील मंत्री आणि आमदारांची मस्ती आहे. त्यांनी तर फक्त आमचे बॅनर फाडले, आम्ही त्यांचे कपडे फाडू शकतो, मी मराठा समाजाला शांत ठेवले आहे, हुं जरी म्हटले तर तुमची पूर्ण जिरवील, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ज्या नोंदी सापडल्या त्यावरून मराठा कुणबी एकच आहे, असा अहवाल तयार केला जात आहे. त्याबाबत कायदा मंजूर करून राज्यभरात सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.