मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 08:15 AM2024-02-28T08:15:16+5:302024-02-28T08:15:38+5:30
प्रत्येक गोष्ट सरकारमार्फत होते असं नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी जरांगेंनी केलेला आरोप खोडून काढला आहे.
मुंबई - Bacchu Kadu on Manoj Jarange Patil ( Marathi News ) जरांगे पाटलांनी जी भाषा वापरली ती आक्षेपार्ह आहे. त्याचे बिल्कुल समर्थन करणार नाही. जरांगे पाटलांनी आरक्षणाव्यतिरिक्त राजकीय भाष्य करू नये. समाजाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. राजकीय वादात त्यांनी पडू नये हे समाजासाठी अधिक फायदेशीर ठरेल. आरक्षणाबाबत काय असेल त्यावर बोलावे. मूळ गोष्टी सोडून बाहेरच्या विषयावर बोलू नये असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले की, आधी जरांगेंचं आंदोलन सरकारला जड होतं, आता सरकार जरांगेंवर भारी पडतंय हे दिसतं. एसआयटी चौकशी करायची तर ज्या अडीचशे लोकांच्या आत्महत्या झाल्या त्यावरही चौकशी करायला हवी. जरांगेंच्या मागील बोलविता धनी कोण, जाळपोळ, दगडफेक कुणी केली याचा शोध घेण्यास हरकत नाही पण ७५ वर्ष मागासलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे हा समाज मागे पडला. आता सगेसोयरेबाबत लोकांचा संभ्रम निघाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली तशी प्रभू रामचंद्राची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी असा टोला त्यांनी लगावला.
तसेच कुणाला विरोधात उभं करण्याची गरज नसते. प्रत्येकाची वैयक्तिक मते असतात. ज्यांना जी गोष्ट पटते ते ते करत असतात. प्रत्येक गोष्ट सरकारमार्फत होते असं नाही. सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यावर प्रक्रिया सुरू आहे असं सांगत बच्चू कडू यांनी जरांगेंनी केलेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिले. सरकार आपल्याविरोधात षडयंत्र रचतंय असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दामुळे सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी विधानसभेत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. जरांगेंचा बोलविता धनी कोण, दगडफेक कुणी करायला सांगितली, कोणत्या कारखान्यावर बैठक झाली यासारखे प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली. त्यावर छत्रपतींचे नाव घेऊन आई बहिणीवर शिवीगाळ करणे योग्य आहे का? यामागचं षडयंत्र आता बाहेर येईल असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी परखड भाष्य केले. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकाराचे गांभीर्य ओळखून मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिलेत.