“छगन भुजबळ नमुना हे ओबीसींना माहिती, आधीच राजीनामा द्यायचा होता”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 05:47 PM2024-01-30T17:47:59+5:302024-01-30T17:49:55+5:30
Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली आहे.
Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर मराठा समाजाने जल्लोष केला. तर दुसरीकडे ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडावर जाऊन मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर घणाघाती टीका केली.
मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले केली, रायगडावर आल्यानंतर विजय प्राप्त होतो. ७० वर्षांनी मराठ्यांसाठी कायदा बनला आहे. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत, त्या मराठ्यांसाठी सगेसोयरे म्हणून हा कायदा पारित झालेला आहे. महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणापासून तसेच ओबीसीत जाण्यापासून वंचित राहणार नाही. हा खूप मोठा कायदा आहे. यावर काही हरकती मागवण्यात आल्या आहेत. मात्र, हे आरक्षण टिकवणे केवळ राज्य सरकारच्या हातात आहे. ते त्यांनी टिकवले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांना छगन भुजबळ यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांचा एकेरी उल्लेख करत बोचरी टीका केली. काहीच करता आले नाही, म्हणून राजीनामा देता का, आधीच राजीनामा द्यायचा होता. ओबीसी बांधवांवर उपकार करता का, ओबीसी बांधव वेडे नाहीत. तुम्ही राजकारणी आहात, नमुना आहात, हे सर्वजण ओळखून आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये वाद निर्माण केला जात आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. सरकार यांना घाबरत नाही, पायाखाली तुडवतात, या शब्दांत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, सरकार तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुणाच्या बाजूने नसतात. ते सत्याच्या बाजूने असतात. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना उभे राहावेच लागणार आहे. अन्यथा ते मराठ्यांच्या नजरेतून पडतील. एक जण खोटे बोलत असल्यामुळे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर डाग येऊ लागला आहे. सगेसोयरे याचा कायदा केला आहे, त्याची अंमलबजावणी त्यांनाच करावी लागणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.