“...तर आमदारकीचा राजीनामा द्यायचा, सुरेश धस हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:51 IST2025-02-22T16:49:28+5:302025-02-22T16:51:56+5:30
Manoj Jarange Patil News: एवढा जीव लावला होता, समाजाने त्यांना तळ हातावर घेतले होते. एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची गरज नव्हती, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला.

“...तर आमदारकीचा राजीनामा द्यायचा, सुरेश धस हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे”: मनोज जरांगे
Manoj Jarange Patil News: संतोष देशमुख हत्या, पिकविमा घोटाळ्यावरून धनंजय मुंडे यांना घेणाऱ्या आमदार सुरेश धसांनी गेल्या आठवड्यात धनंजय मुंडेंची बंद खोलीत भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. यानंतर सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांशीही चर्चा केली. सुरेश धस यांनी धनंजय देशमुख यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचवेळी मस्साजोगमधील ग्रामस्थांनीही गुंड आणि पोलिसांमध्ये असलेल्या मिलीभगत याबद्दल प्रश्न उपस्थित केले. यावरून आता मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करताना सुरेश धस यांच्यावर असलेली तीव्र नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली.
मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांची बदली केली, हे मान्य आहे. पण, खालच्या पोलीस अधिकाऱ्यांचं काय? असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी धसांना केला. पोलीस उप अधीक्षकांसह पोलीस प्रशासनातील सगळे अधिकारी यांचे मित्र आहेत, असे धनंजय देशमुख म्हणाले. तर सगळ्यांच्या बदल्या कराव्या लागतील अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली. यांची बदली करून होणार नाही, यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली.
सुरेश धस हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्यासाठी तो विषय संपला आहे. त्यावर मला बोलायचे नाही. एवढा जीव लावला होता, समाजाने त्यांना तळ हातावर घेतले होते. एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची गरज नव्हती. पक्षाचा दबाव होता तर सरळ सांगायला पाहिजे होते की, पक्षाने माझ्यावर दबाव आणला. मला सांगत आहेत की, प्रकरण दाबून टाक तू. मागे सरक. सुरेश धस यांनी असे सरळ जाहीर करायला हवे होते. समाजाची गद्दारी करू शकत नाही, हे सुरेश धसांनी म्हणायला पाहिजे होते. धनंजय मुंडे यांना भेटायला जात नाही. मी पक्षाचा आणि आमदारकीचा पण राजीनामा देत आहे, असे सुरेश धस यांनी सांगायचे होते. सुरेश धस यांचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली.
दरम्यान, भाजपा आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते परळी येथे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर एका कार्यकर्त्याच्या घरी जात असताना सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून विरोध करण्यात आला. काळे झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.