धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:36 IST2025-01-15T17:32:57+5:302025-01-15T17:36:32+5:30
आता आरोपींचे समर्थन करायचे ते करू द्या. संतोष देशमुखांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. धनंजय मुंडे जातीला पुढे करतो. पाप तुम्ही करायचे आणि ओबीसींना पुढे करायचे हे चालणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले
बीड - खंडणीतल्या आरोपींना आम्हाला वाचवा म्हणून सरकारमधल्या मंत्र्याला मदत मागितली असणार आहे. या घटनेतील एकही आरोपी सुटता कामा नये. धनंजय मुंडेंची गुंडाची टोळी संपली पाहिजे. ही टोळी दहशत निर्माण करणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना भेटण्याची धनंजय मुंडेंची मानसिकता नाही. हा क्रूर आहे. खून करणाऱ्यापेक्षा त्याचा कट रचून गुन्हा घडवून आणणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. आरोपींना साथ देणारा सरकारमधीलच मंत्री आहे तोदेखील गुन्हेगार आहे असं सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडेंवर भडकले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीड कोर्टाने वाल्मीक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कोर्टाबाहेर पोलिसांनाही धमक्या दिल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी यांचा माज बघावा. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. धनंजय मुंडे पांगरीत त्यासाठीच आले. पाप झाकण्यासाठी गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला आहे. ही टोळी रस्त्यावर उतरून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. या टोळीमुळे एकाही गरीबाला त्रास होता कामा नये अन्यथा आम्हीही सहन करणार नाही असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय जातीय तेढ निर्माण करून दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांचा आहे. धनंजय मुंडे हा टोळ्या चालवतोय. परळीत आंदोलन त्याच्या सांगण्यावरून होतंय. मराठ्यांना आवाहन आहे शांततेचे भूमिका घ्या. न्यायालय आणि पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे. आता आरोपींचे समर्थन करायचे ते करू द्या. संतोष देशमुखांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. धनंजय मुंडे जातीला पुढे करतो. पाप तुम्ही करायचे आणि ओबीसींना पुढे करायचे हे चालणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
दरम्यान, पांगरी जाऊन आरोपींच्या घरच्यांना मंत्री भेटतो. यानेच आंदोलन करणाऱ्या टोळीला जातीय तेढ निर्माण करण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांनी थांबवावं. कोर्टासमोर धिंगाणा करणार असतील. पोलिसांनी दादागिरी करू नये आम्ही सहन करणार नाही ही भाषा वापरली जाते. संचारबंदी लागू केली ती कुठे गेली...सामाजिक सलोखा ठेवायचा नाही. जिल्ह्याची शांतता भंग करायची. खूनातील आरोपीला पाठीशी घालण्याचं काम धनंजय मुंडेंची टोळी करतेय. धनंजय मुंडे हा फडणवीस सरकारला लागलेला डाग आहे. धनंजय मुंडेंचाही खूनात हात आहे का अशी १०० टक्के आता शंका यायला लागली आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला.