जरांगेंच्या आरोपांवर शेलार स्पष्टच बोलले, म्हणाले- "देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 06:29 PM2024-02-25T18:29:49+5:302024-02-25T18:32:43+5:30
मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड गंभीर आरोप केले आहेत
Ashish Shelar on Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis, Maratha Reservation, मराठा समाजाला न्याय मिळाला, आरक्षण मिळावं या भूमिकेचे समर्थक भारतीय जनता पार्टी आहे. आतादेखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान, अधिवेशनात भाजपाने मराठा आरक्षणाला समर्थन दिले आहे. समाज जे मागतोय त्या बाबींची कायदेशीर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम मनोज जरांगे पाटीलांनीही मान्य केले होते. आधीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा न्यायिक आरक्षण दिले होते. त्यामुळे अशा व्यक्तीवर बिनबुडाचे आरोप करणे आम्हाला मान्य नाही, असमर्थनीय आहेत, अशा शब्दांत जरांगे पाटील यांच्या आरोपांवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मत व्यक्त केले.
"समाजाला न्याय मिळवून देऊ हीच या सरकारची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाजवळ शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला १० टक्क्यांचे टीकणारे आरक्षण दिले आहे. अन्य जे विषय प्रलंबित आहेत, ते विषय चर्चेने सोडवले जाऊ शकतात. या साऱ्या गोष्टींना राजकीय रंग देणे मराठा समाजाला मान्य नाही. मराठा समाज राजकारणाच्या विरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आग्रही आहे. याबाबतीत राजकारण करता कामा नये," असे इशारावजा सल्ला त्यांनी साऱ्यांनी दिला.
"सलाइनमधून विषप्रयोगाचा प्रयत्न हे आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोलायला हवे. देवेंद्र फडणवीसांचा आतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिल्यास, ते कुठेही वेडीवाकडी भाषा वापरताना दिसलेले नाहीत, राजकीय वितुष्ट वाढवताना दिसलेले नाहीत, संविधान आणि कायदा याच्या पलिकडे ते कधीही बोलत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींवर बिनबुडाचे आरोप करण्याचा आम्ही निषेध करतो," अशा शब्दांत शेलारांनी जरांगे यांचे फडणवीसांवरील आरोप फेटाळून लावले.