सरकारने ती चूक करू नये, तसं झाल्यास गावाकडे असलेले मराठेही मुंबईत येतील, जरांगे पाटील यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 05:07 PM2024-01-26T17:07:09+5:302024-01-26T17:07:47+5:30
Maratha Reservation: मराठा आंदोलक शांततेत आंदोलन करत आहेत. जर सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास गावाकडे राहिलेले मराठेही झाडून मुंबईत येतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या सीमेवर धडकलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने काही मागण्या मान्य केल्याने आजची रात्र नवी मुंबईतील वाशी येथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत काढण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास मुंबईत येण्याबाबतचा निर्णय उद्या दुपारी १२ वाजता घेतला जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच मराठा आंदोलक शांततेत आंदोलन करत आहेत. जर सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास गावाकडे राहिलेले मराठेही झाडून मुंबईत येतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
या मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला आरक्षण मिळो वा न मिळो आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत. सध्या मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहेत. आता आम्ही आणखी वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे आम्ही सरकारचा सन्मान करून आणखी वेळ वाढवून दिला आहे, असा संदेश आमच्या समाजामध्ये जाणार आहे. मात्र आता सरकारने काही दगाफटका केला, तर आहेत ते मराठे देखील झाडून मुंबईकडे येण्यासाठी निघतील. त्यामुळे आता सरकारला आरक्षण द्यावंच लागणार आहे, असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
तसेच आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या मराठा तरुणांच्या सुरक्षेबाबतही मोठं विधान केलं आहे. एकाही मराठा तरुणाला पोलिसांनी धक्का लावला तर साडे पाच कोटी मराठे घरी दिसणार नाहीत, सर्वांना झाडून मुंबईत बोलावलं जाईल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला, आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सामान्य विभागाचे सचिव सारासार निर्णय घेऊन आपल्याकडे आले होते. सरकारचे मंत्री चर्चेला आले नाहीत पण सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत तर त्या प्रमाणपत्राचे तुम्ही वाटप करा. नोंदी कुणाच्या सापडल्या त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात यादी चिटकवा. ज्याला नोंद मिळाली हे माहिती नसेल मग तो अर्ज कसा करणार? त्यासाठी सरकारने गावागावात शिबिरे सुरू केलेत. नोंदीही ग्रामपंचायतीला लावायला सुरुवात केली. ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या कुटुंबाला याआधारे प्रमाणपत्रे देण्यात यावे. एका नोंदीवर ५० ते १५० जणांना फायदा होतोय. यामुळे २ कोटी मराठा आरक्षणात जाणार आहे असं त्यांनी सांगितले.