“मला हलक्यात घेऊ नका, राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल”; मनोज जरांगेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 10:30 AM2024-08-16T10:30:21+5:302024-08-16T10:33:50+5:30
Manoj Jarange Patil News: राजकारणात आलो तर तुम्ही बांधलेली सगळी गणिते चुकणार आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil News: राजकीय भाषा बोलतो, कारण तुम्ही आरक्षण देत नाही. तुम्ही आरक्षण द्या, राजकीय भाषा बंद करतो. आरक्षण देणार नसाल तर मग माझ्यापुढे पर्याय नाही. माझ्या समाजाचे मतदान घेऊन माझ्या समाजाच्या लेकरांचे वाटोळे करणार असाल आता तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही. मला हलक्यात घेऊ नका, राजकारणात आलो तर तुमचा सुफडा साफ होईल, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मला राजकारणात पाय ठेवायला लावू नका. राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल. मला आणि समाजाला राजकारणात जायचे नाही. मला त्यात ढकलू नका. राजकारणात आलो तर तुम्ही बांधलेली सगळी गणिते चुकणार आहेत. माझी राजकारणात यायची इच्छा नाही. मी जर एकदा घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही. मी शेतकऱ्यांपासून बारा बलुतेदारांपर्यंतचे प्रश्न मांडत आहे. आता गोरगरीब मराठा शेतकऱ्यांचे राज्य आणल्याशिवाय मागे सरकणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
सत्ता परिवर्तन व्हायला हवे, गोरगरीब सामान्य लोक विधानसभेत गेले पाहिजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. महाविकास आघाडी, महायुतीला लोक वैतागले आहेत. सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे. गोरगरीब सामान्य लोक विधानसभेत गेले पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात नवं समीकरण घडवून आणत आहोत. आमच्या अजून बऱ्याच चर्चा बाकी आहेत, असे राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, राजरत्न आंबेडकर यांनी नुकतेच राज्याच्या राजकारणात उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आरपीआय नावाने नवा पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे आता ते राजकीय समीकरण जुळवू पाहतायत. राजरत्न आंबेडकर यांच्या भेटीपूर्वी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्यात बैठक झाली होती.