“बेट्या, तुझा इंगा जिरवतो, टांगा उलटवणार”; मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा छगन भुजबळांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 07:59 PM2024-06-25T19:59:29+5:302024-06-25T20:00:16+5:30
Manoj Jarange Patil Slams Chhagan Bhujbal: शेकडो वाहनांच्या ताफ्यासह अंतरवाली सराटीत दाखल होऊन मनोज जरांगे पाटील यांनी शक्तिप्रदर्शन केले. तसेच आता जर तुम्ही पलटलात, तर सरकारला पलटी करू, असा इशारा दिला.
Manoj Jarange Patil Slams Chhagan Bhujbal: सगेसोयरेच्या अमंलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. १३ जून रोजी सगेसोयरे अंमलबजावणीचे बेमुदत उपोषण सरकारला एक महिन्याचा अवधी देऊन स्थगित करण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. १२ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर शेकडो वाहनांच्या ताफ्यासह अंतरवाली सराटीत दाखल होऊन जरांगे पाटलांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मनोज जरांगे यांनी सरकार आणि छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा इशारा दिला.
अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळ परिसरात गावकऱ्यांनी रांगोळी काढली होती. त्याच बरोबर गावात प्रवेश करताच महिलांनी जरांगे पाटील यांचे औक्षण केले. पुष्पवृष्टी करून जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणा देण्यात आल्या. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षणासाठी सातत्याने लढावे लागणार आहे. सरकार पलटले, तर आपल्यासमोर तीन पर्याय राहणार आहेत. आपण पुन्हा मुंबईला जाऊ. त्यावेळी तुम्ही म्हणाल तेव्हाच मी बाहेर येणार. दुसरा पर्याय त्यांचा पूर्ण टांगा विधानसभेत उलटवायचा आणि तिसरा पर्याय २८८ जागा लढायच्या का पाडायच्या याचा निर्णय १३ तारखेनंतर घेऊ, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला.
तुझा इंगा जिरवतो, टांगा उलटवणार
आपल्या विरोधात कितीही जातीवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या तरी आपण जातीवाद करायचा नाही. अंतरवलीतील सगळा समाज आपला आहे. आपली घडी विस्कळीत होऊ देऊ नका, तो येवल्याहून आला तो भांडण लावेल, दंगली करेल आणि निघून जाईल. खेड्यातील ओबीसी मराठा एक आहे. मराठ्यांनी त्यांचे दंगली घडवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही. भाऊ तुझा असा इंगा जिरवतो, बेट्या, तुझा टांगा उलटवणार. तू जेवढे करशील तेवढे मराठे एक होत आहेत, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी समाजासोबत आहे. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. सगेसोयऱ्यांची व्याख्या आमच्या म्हणण्यानुसार घ्या आणि नंतरच अंमलबजावणी करा. हैदराबादचे गॅझेट, मुंबई गव्हर्मेंटचे गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट लागू करा, यादीतील ८३ क्रमांकावर कुणबी व मराठा एकच आहेत, त्यामुळे २००४ च्या जीआरमध्ये दुरुस्ती करा, ही आमची मागणी आहे. आता जर तुम्ही पलटलात, तर सरकारला पलटी करू, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला.